वसई : नायगाव पूर्वेच्या भागात जूचंद्र उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु या कामाच्या संथगतीचा फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. खडतर पर्यायी रस्ते, धुळीचा त्रास, वाहतूक कोंडी अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरात असलेल्या एल सी क्रमांक नऊ या रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडी सुटावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षभरापूर्वी जूचंद्र रेल्वे फाटाकावर १ हजार ३८६ मीटर लांबीचा उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे.
काम सुरू करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूने अडथळे लावून बाजूने रस्ता तयार केला आहे. या पर्यायी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जूचंद्र रेल्वेमार्गावर विविध रेल्वे गाड्यांची ये-जा सुरूच असते. जेव्हा गाडी येथे तेव्हा फाटक बंद होते. अशा वेळी दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. रस्ता व्यवस्थित असेल तर वाहने पटकन निघून जातात मात्र पर्यायी रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने वाहनांची गती मंद होते. त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यातच रस्त्यावर प्रचंड धूळ सुद्धा उडत आहे. त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाचे नियोजन करणे गरजेचे होते. तसे न केल्याने आजही येथील नागरिकांना याचा फटका बसत आहे, असेही नागरिकांनी सांगितले आहे. पर्यायी रस्ते काँक्रिटचे करण्यात येत आहेत. त्याचेही काम एक ते दोन महिन्यांत पूर्ण केले जातील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : पोलीस भरतीचा दुसरा टप्पा : मिरा भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालयात १ हजार ८२ पदे भरणार
एकाच वेळी होत असलेल्या कामांमुळे कोंडी
उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच आता एकाच वेळी गटार व्यवस्था, रस्त्याचे रुंदीकरण, खोदकाम अशी सर्व कामे एकाच वेळी केली जात आहेत. ती कामे सुद्धा अगदी कासवगतीने सुरू असतात. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा फटका शाळकरी मुले, रुग्णवाहिका यांना ही बसत आहे.
हेही वाचा : कुख्यात टोळीतील ६ जणांविरोधत मोक्का अंतर्गत गुन्हे
भूसंपादन अडथळे कायम
उड्डाणपुलाचे ६० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र उर्वरित कामात भूसंपादन प्रक्रियेत हरकती नोंदविण्यात आल्या होत्या त्यामुळे हे काम रखडले आहे. भूसंपादन प्रक्रिया पार पडली तर पुढील कामे ही जलदगतीने पूर्ण केली जातील त्याच अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत ठाकरे यांनी सांगितले आहे.