कल्पेश भोईर

वसई: आई जगदंबेच शक्ती स्वरूप म्हणून साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार पासून सुरवात झाली आहे. विरार येथील जीवधन गडावर सुप्रसिद्ध असलेल्या जीवदानी देवीचा नवरात्री उत्सवानिमित्ताने नऊ दिवस जागर केला जात आहे. वसई विरारचा निसर्गरम्य असा परिसर असून या भागात विविध ठिकाणच्या भागात देवदेवतांची प्राचीन कालीन मंदिरे आहेत त्यापैकीच एक म्हणजे विरार पूर्वेच्या भागात वसलेले आई जीवदानी मातेचे मंदिर

जीवनदानी म्हणजे जीवनदायीनी, ऐतिहासिकदृष्ट्या हे मंदिर प्राचीन कालीन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. येथील एका गुंफेत पाच पांडवांनी देवीची स्थापना केली होती. याशिवाय याबाबत आणखीन काही आख्यायिका सांगितल्या जातात. आई जीवदानीचं मंदिर १७ व्या शतकात बनवलं गेल्याचं म्हटलं जातं. अन्य मंदिरांप्रमाणेच या मंदिरांतही जलकुंडांची निर्मिती केली होती. मात्र बदलत्या काळानुसार जीवदानी मंदिर ट्रस्ट तर्फे मंदिरात विविध प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. मंदिरात जाण्यासाठी १ हजार ४०० पायऱ्या चढून जावे लागत आहे.डोंगरावर चढताना दोन्ही बाजूने हिरवीगार अशी वनराई आहे. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या शिवाय पाचपायरी हा जुना मार्ग असून काही भाविक पायवाटेने जातात.

आणखी वाचा-रायगडमध्ये जलजीवन मिशनच्या कामांची संथगती

तसेच जे पायऱ्या चढून जाऊ शकत नाही अशा भविकांसाठी लिफ्टची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.मागील काही वर्षांपासून अधिकच प्रसिद्ध असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात. विशेषतः शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असल्याने नऊ दिवसात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात.

येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासह भंडाऱ्याची सोय असणार आहे. त्याचप्रमाणे श्री जीवदानी देवी मंदिराला पूर्ण विद्युत रोषणाई केली असून देवीच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पूजा, होमहवन, महाआरती, महाप्रसाद, गरबा नृत्य असे कार्यक्रम पार पडत आहेत.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर ट्रस्टने पूर्ण तयारी केली आहे, तर मंदिर परिसरात व डोंगराच्या पायथ्यापर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवरात्रीउत्सवाच्या पहिल्याच दिवशीपासून जीवदानी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Story img Loader