वसई – पाच वर्षांपूर्वी नालासोपारा येथे झालेल्या जोगेंद्र राणा हत्या प्रकरणात मनोज सकपाळ आणि मंगेश चव्हाण या दोन पोलिसांवर तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणे पोलिसांतर्फे या प्रकरणाची नव्याने चौकशी केली जाणार आहे.
२३ जुलै २०१८ रोजी पोलीस हवालदार मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ गुंड जोगेंद्र उर्फ गोविंद राणा याला अटक करण्यासाठी नालासोपारा पूर्वेच्या राधानगर येथे गेले होते. यावेळी झालेल्या चकमकती जोगेंद्र राणा याचा मृत्यू झाला होता. राणा याने पोलिसांवर हल्ला केल्याने बचावासाठी केलेल्या प्रत्युत्तरात राणा याचा मृत्यू झाला होता. मात्र ही बनावट चकमक असल्याचा आरोप मृत राणा याचा भाऊ सुरेंद्र राणा याने केला होता.
हेही वाचा – श्रावणात ठिकठिकाणी जुगाराचे पेव; नालासोपार्याील जुगार अड्यावर कारवाई, ८ जणांना अटक
याप्रकरणी अनेक चौकश्या झाल्या. अखेर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांच्याकडे तपास सोपवला. त्यानुसार तुळींज पोलीस ठाण्यात मनोज सकपाळ आणि मंगेश चव्हाण यांच्या विरोधात हत्येप्रकरणी ३०२, १२० (ब) २०१, ३८६, ३४ तसचे शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची आता नव्याने चौकशी केली जाणार आहे. मंगेश चव्हाण सध्या नालासोपारा पोलीस ठाण्यात असून मनोज सकपाळ गुन्हे शाखा ३ मध्ये कार्यरत आहेत.