वसई- लग्नात शिरून लहान मुलांच्या मदतीने दागिने आणि रोख रक्कम लंपास करणार्या मध्यप्रदेशातील कुप्रसिध्द ‘कडीया सासी’ टोळीतील एकाला अटक करण्यात बोळींज पोलिसांना यश आले आहे. या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या बोळींज पोलिसांच्या पथकाला गावातील ग्रामस्थांनी प्रतिकार करत ११ दिवस झुंजवत ठेवले होते.
विरार मध्ये राहणार्या मिनल पाटील यांच्या मुलीचे २० फेब्रुवारी रोजी लग्न होते. रात्री १० च्या सुमारास लग्नात आहेर म्हणून आलेले ८ लाख रुपये आणि ३ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा बोळींज पोलिसांनी तपास केला असता एक लहान मुलगा बॅंग नेत असल्याचे दिसून आले. पुढील तपासात लग्न सोहळ्यात चोरी करण्यासाठी कुप्रसिध्द असलेली मध्य प्रदेशातील कडिया सासी टोळी यामागे असल्याचे निष्पन्न झाले.
११ दिवसांचा प्रतिकार, पोलिसांवरही हल्ला
बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या टोळीतील चोरांना शोधण्यासाठी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया, गुलखेडी, हुलखेडी या गावात गेले. संपूर्ण गावातील ग्रामस्थच अशा चोरीच सक्रीय असल्याचे आढळले. ग्रामस्थांनी पोलिासंना गावाच शिरू न देता जोरदार विरोध केला आणि आरोपींना लपवून ठेवले होते. त्यामुळे या टोळीतील आरोपीेंना पकडता येत नव्हते. दरम्यान, अन्य गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या पथकावरही ग्रामस्थांनी हल्ला केला होता. बोळींज पोलिसांनी मग राजगड जिल्ह्यातील बोडा पोलिसांच्या मदतीने गावात प्रवेश केला आणि टोळीतील विकासकुमार सिसोदिया (सासी) (३३) याला अटक केली. मात्र या गदारोळात अन्य ४ आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. विशेष म्हणजे लुटीतील ८ लाख रोख रकमेपैकी ९ लाख ९० हजार रुपये हस्तगत करण्यात यश आले.
या टोळीत ५ जणांचा समावेश होता. १७ फेब्रुवारी रोजी ते वसईत आले आणि एका लॉज मध्ये मुक्काम केला. त्यानंतर शहरातील लग्नसोहळ्याची रेकी केली. एका लहान मुलाच्या मदतीने विरार मधील लग्नसोळ्यातील बॅग लंपास केली होती अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत (गुन्हे) तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, विष्णू वाघमोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. अशा वेळी चोरांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे लग्नस्थळी वावरणारे संशयितांवर लक्ष ठेवणे, आपल्या मौल्यवान वस्तूंंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे.