वसई: वसई पूर्वेकडील कामण तलाठी कार्यालय मोडकळीस आले आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाची ही अवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वसई पूर्वेकडील कामण परिसरात महसूल विभागाचे अनेक वर्षे जुने तलाठी कार्यालय आहे. या कार्यालयाअंतर्गत कामण, पोमण, मोरी, शिल्लोत्तर, नागले, देवदल, बेलकडी यासह १०-१२ गावपाडय़ांचा समावेश आहे. जागेच्या संदर्भातील उतारे, फेरफार, गाव नमुना, पंचनामे व इतर शासकीय कामांसाठी नागरिकांची वर्दळ या कार्यालयात असते. पण महसूल विभागाने येथील दुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. छपरावरील कौले निखळू लागली आहेत, भिंतीही पडझड होण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासनाला या कार्यालयामार्फत मोठय़ा प्रमाणात महसूल मिळत असतानाही कार्यालयाचे नूतनीकरण न करण्याचे कारण कळत नाही. पावसाळय़ात दरवर्षी छपरातून पाणी गळती होते. ताडपत्री लावावी लागते. तसेच जुन्या बांधकामामुळे एखादा अपघात घडल्यास आणि नागरिक अथवा कर्मचारी जखमी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. अनेकदा या गोष्टी महसूल विभागाच्या निदर्शनास आणूनही विभागाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.
कामण तलाठी कार्यालय मोडकळीस
वसई पूर्वेकडील कामण तलाठी कार्यालय मोडकळीस आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-02-2022 at 00:03 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaman talathi office repair needed inconvenience ysh