वसई: विरारच्या मारंबळपाडा परिसरात जुन्या जेट्टीपासून ते नवीन जेट्टीपर्यंत रस्ता तयार केला जात आहे. मात्र या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरार पश्चिमेच्या भागात मारंबळपाडा परिसर आहेत. येथील खाडी किनारा हा कांदळवन वृक्षांच्या निसर्गसौंदर्याने भरलेला असा हा किनारा आहे. याच भागात आता नवीन जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. या जेट्टीपर्यंत जाण्याचा पोहोच रस्ता तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे. जुन्या जेट्टीपासून ते नवीन जेट्टी असा जवळपास अर्ध्या किलोमीटरचा रस्ता तयार केला जात आहे. यासाठी कांदळवन असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात माती भराव टाकला जात आहे. त्यामुळे शेकडो कांदळवनांची वृक्ष यात गाडली जाऊन ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही झाडांची कत्तलही करण्यात आली आहे.

हेही वाचा – पुरे झाली शोभा…

सुरुवातीला खाडीतून भरतीचे पाणी गावात व शेतात येवू नये यासाठी अंदाजे ५ फूट रुंदीचा बांध तयार केला होता. या बांधाला लागून व बांधावरही २०-२० फूट उंचीचे कांदळवन वृक्ष १५ फूट रुंद रस्ता बनविण्यासाठी कापण्यात आली. अशी शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे.

या जेट्टी प्रकल्पासाठी नारंगी ते मारंबळपाडा असा रस्ता मंजूर होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत थेट कांदळवनातूनच हा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी कोणत्याच विभागाची परवानगी न घेता हे काम सुरू आहे असे डाबरे यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यासह संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

कारवाईसाठी चालढकल

चिखलडोंगरी व मारंबळपाडा परिसर पर्यावरण दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. शासकीय प्रकल्प उभारताना यासाठी कायदेशीर मार्गाने परवानगी घेणे आवश्यक होते. ती न घेताच या ठिकाणी कत्तल सुरू केली आहे. यापूर्वी जून २०२४ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महसूल विभाग वसई व वन विभाग मांडवी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व ठेकेदारांवर कारवाई करण्याची शिफारस केली. परंतु महसूल व वनविभाग दोन्ही विभागाकडून कारवाईसाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे.

हेही वाचा – २९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

अधिकाऱ्यांकडून पुन्हा पाहणी

कांदळवनांच्या पर्यावरण प्रेमींच्या वाढत्या तक्रारीमुळे महसूल व वनविभाग, कांदळवन विभाग यांच्या मार्फत नुकताच पुन्हा एकदा या घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. पाहणी करून या भागाचा पंचनामा व माहिती घेतली आहे. त्याची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर केला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kandalwan damage for new jetty virar marambalpada ssb