वसई – मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची घोषणा करण्यात आली आहे. काशिमिरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून हे पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे. आयुक्तालयातील हे १८ वे पोलीस ठाणे असणार आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली होती. या नव्या आयुक्तालयात त्यावेळी एकूण १३ पोलीस ठाणी होती. त्यापैकी वसई विरार शहरात वसई, माणिकपूर, वालीव, तुळींज, नालासोपारा, अर्नाळा सागरी विरार अशी ७ पोलीस ठाणी होती. तर मिरा-भाईंदर शहरात मीरा रोड, भाईंदर, नयानगर, नवघर, काशिमिरा आणि उत्तन सागरी अशी ६ पोलीस ठाणी होती.
नवीन पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करताना पोलीस ठाण्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार वसई विरार शहरात आणखी पाच नवीन पोलीस ठाणे तयार केली जाणार होती. त्यापैकी पेल्हार, आचोळे, मांडवी आणि नायगाव ही ४ पोलीस ठाणी तयार करण्यात आली, तर बोळींज पोलीस ठाणे जागेअभावी रखडले होते.
हेही वाचा – वसई: पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार
आता परिमंडळ १ मध्ये काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. काशिमिरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून हे पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. जितेंद्र वनकोटी यांची या काशिगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या जागेचा शोध सुरू आहे. भाड्याने किंवा मालकी जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. येत्या २६ जानेवारी रोजी या काशिगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.