वसई- अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्या घरी नेला आणि खोटा मृत्यू दाखला बनविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या भावाला नायगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरूवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

वसई पूर्वेच्या कामण येथे राहणाऱ्या ईस्माईल चौधरी (२४) याचे नुकतेच खुर्शिदा खातून (२१) हिच्या सोबत लग्न झाले होते. ईस्माल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात वाद व्हायचे. बुधवारी दुपारी त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला. यावेळी ईस्माईलने ओढणीने खुर्शिदाचा गळा आवळून हत्या केली. ‘ओला’ या खासगी टॅक्सीत टाकून नवजीवन येथे राहणार्‍या भावाकडे घेऊन आला. पत्नीची हत्या दडविण्यासाठी ईस्माईलने बनाव रचला. तिच्या पोटात दुखत असल्याने मृत्यू झाल्याची खोटी माहिती त्याने पत्नीचा पुण्यात राहणार्‍या भावाला दिली. दरम्यान, डॉक्टरांकडून बनवाट मृत्यू दाखला (डेथ सर्टिफिकेट) बनविण्याचा प्रयत्न करू लागला.

हेही वाचा >>>आमदार राजेश पाटील बहुजन विकास आघाडीतच; पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्टीकरण

मृतदेह १२ तास शीतपेटीत

बुधवारी रात्री मयत खुर्शिदाचा भाऊ घरी आला. मात्र आपली बहिण आजारी नव्हती मग अचानक तिच्या पोटात कसे दुखू लागले? आणि पोटाच्या दुखण्याने मृत्यू कसा झाला याबाबत त्याला संशय आला. त्यामुळे त्याने मृतदेहाच्या शवविच्छेदनाची मागणी केली. याच काळात मृत्यू दाखला बनविणार्‍या डॉक्टरांनीही संशय व्यक्त केली आणि ही बाब पेल्हार पोलिसांना समजली. आम्ही आरोपीची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले. हत्या नायगाव पोलिसांच्या हद्दीत घडल्याने आरोपीला नायगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

हत्या प्रकऱणात दोन्ही भाऊ आरोपी

आरोपी ईस्माईल याने भावाला पत्नीची हत्या केल्याचे सांगितले होते. त्याने देखील ही बाब पोलिसांना न सांगता दडवून ठेवली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.