वसई: नालासोपारा पूर्वेच्या विवांता हॉटेल जवळ खोदकाम करताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पालिकेचे मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदकाम करताना ही घटना घडली. ढेना हांसदा (४८) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

नालासोपारा पूर्वेच्या विवांता हॉटेल जवळच्या भागात मलनिस्सारण वाहिनी तयार करण्याचे काम वसई विरार महापालिकेने सुरू केले आहे. या कामाचा ठेका इगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला. ही मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी खोदकाम सुरू असताना त्याच्या बाजूचा मातीचा ढिगारा थेट मजुराच्या अंगावर कोसळला. या मातीच्या ढिगाऱ्याखाली ढेना हांसदा हा मजूर दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

ढेना हांसदा हा मूळचा झारखंड राज्यातील राहणारा असून सध्या तो वसई विरार मध्ये मजुरीचे काम करीत होता.या घटनेची माहिती तुळींज पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह बाहेर काढून  रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले आहे.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप

मलनिस्सारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे. जवळपास दहा ते बारा फूट इतका खोल खड्डा खणला जात आहे.  मात्र त्या ठिकाणी जे मजुर काम करतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून यात कोणी दोषी असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी याशिवाय त्या मजुराच्या कुटुंबाला योग्य मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Story img Loader