विरार : वसई विरार महापालिका क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून कचऱ्याच्या डब्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र पालिकेने अतिरिक्त डब्यांची खरेदी केली होती, तरी नागरिकांना कचऱ्याचे डबे मिळत नाहीत. मग हे खरेदी केलेले डबे गेले कुठे, असा सवाल करत नागरिकांनी या कचरा डबे खरेदीवरच शंका निर्माण केली आहे.
वसई विरारमध्ये घनकचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचऱ्याची वर्गवारी करण्यासाठी पालिका सक्ती करत आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या डब्यांचा पुरवठाच करत नाही. गेले काही महिने पालिकेने हे निळे आणि हिरवे डबे देण्याचे बंदच करून टाकले आहे. सुका कचरा निळय़ा डब्यात तर ओला कचरा हिरव्या डब्यात वेगळा करावा, असे आवाहन पालिकेने केले होते. जनजागृतीप्रीत्यर्थ पालिकेने करोडो रुपये जाहिरातींवर खर्च केले होते. या उपक्रमासाठी पालिकाच डबे पुरवणार असे सांगितले असताना आता पालिका डबेच देत नाही. सुरुवातीला पालिकेने डबे दिले, परंतु ते वर्षांच्या आतच निकामी झाले. त्यामुळे डब्यांची मागणी वाढली. मात्र महापालिकेकडे डबेच नव्हते. महापालिका आरोग्य निरीक्षक नीलेश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडे सध्या एकही डबा नाही. ठेकेदाराला त्याचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच डबे मिळतील.
पण यातील गोम अशी की, वसई विरार महानगरपालिकेने २०१९ मध्ये पेल्हारच्या जलशुद्धी केंद्राच्या अडगळीच्या ठिकाणी कचऱ्याचे हजारो नवे डबे फेकले होते. ‘लोकसत्ता’ने त्याविषयी बातमीही प्रसिद्ध केली होती, परंतु पुढे पालिकेने त्या डब्यांचे काय केले याची काहीही माहिती मिळालेली नाही. परंतु पालिकेच्या २०१९च्या मुख्य लेखापरीक्षण अहवालात या डब्यांचा संदर्भ आढळून आला. त्या वेळी असे लक्षात आले की, १३ हजार डब्यांची आवश्यकता असताना पालिकेने १४ हजार ३३९ डबे अतिरिक्त मागवले आहेत. त्यांचे पुढे काय झाले याची काहीच माहिती उपलब्ध नाही. ती देण्याची तसदी पालिका घेत नाही.
दुसरीकडे नागरिकांची कचऱ्याच्या डब्यांची मागणी वाढली तरी पालिकेच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे डबे नाहीत. त्यामुळे फुटके डबेच नागरिक वापरत आहेत. ओला कचरा असलेल्या डब्यातून घाण पाणी, दुर्गंधी गृहसंकुलांच्या आवारात पसरत आहे. रोगराईची भीती निर्माण झाली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास घंटा गाडीद्वारे तो उचलला जात नाही. सहा-सहा महिने पाठपुरावा करूनही अनेक गृहसंकुलांना हे डबे मिळालेले नाहीत. शेवटी त्यातील अनेकांनी स्वखर्चाने डबे विकत घेतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा