प्रसेनजीत इंगळे
वसई, विरार शहर इतिहासाच्या पानांवर आपले स्वत:चे वेगळे स्थान घेऊन विकसित होत असताना, शहरातील ऐतिहासिक आणि पारंपरिक ठेवा जतन करण्यात प्रशासन राजकीय मंडळी आणि स्थानिक नागरिक अपयशी ठरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून इतिहासाची पाने गौरवशाली अध्यायाने लिहिणारी पर्यटन स्थळे शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला हा ऐतिहासिक वारसा केवळ पुस्तकाच्या पानांतच पाहता येणार आहे, असेच दिसत आहे.
वसई, विरार शहरात अगदी चौथ्या शतकापासूनचे अवशेष सापडत आहेत. त्यात वसईचा जंजिरा किल्ला, वसईच्या शिरपेचात चिमाजी अप्पांनी रोवलेला तुरा पेशवाईच्या जाज्वल्य पराक्रमाचे अभूतपूर्व दर्शन घडवितो. तर अर्नाळा येथील जलदुर्ग, चारही बाजूंनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याकडे होते. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठय़ांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बाधणी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तीन साम्राज्यांचा इतिहास असलेल्या या किल्ल्याला आज कुणी वाली उरला नाही. या किल्ल्याचे पहिले मराठा आरमाराचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांची समाधी याच परिसरात आहे; पण या समाधीची साधी नोंदही पुरातत्त्व विभागाकडे नाही. खासगी जागेत असलेली ही समाधी शेवटच्या घटका मोजत आहे. या समाधीवर मोठमोठी झाडे उगवली असून या समाधीची इमारत दुभंगली आहे. अर्नाळा किल्ला विकासाच्या प्रतीक्षेत रखडला आहे. या किल्ल्यात पर्यटक, अभ्यासक यांना जाण्यासाठीसुद्धा आजतागायत चांगल्या सोयीच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत.
वज्रेश्वरी येथील महालक्ष्मीचे मंदिर ते विरारच्या जीवदानी मंदिरापर्यंत आणि नालासोपारा येथील बौद्ध स्तूपापासून ते गांधीजींच्या अस्थिस्तंभापर्यंत वसईत अनेक पुरातन वास्तू, मंदिरे जागोजागी उभी आहेत. बौद्ध, जैन, सातवाहन, गौतमीपुत्र, शतकर्णी, शिलाहार, मुघल व पोर्तुगीज ह्या काळातील शिलालेख, प्राचीन वस्तू, भांडी, मूर्ती, अवजारे, चित्र अशा अनेक वस्तूंचा खजिना काळाचा मारा सहन करत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यातील जवळपास १५० हून अधिक शिलालेख विद्रूप झाले आहेत. ते कायमस्वरूपी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही शिलालेख मातीच्या ढिगाऱ्याखाली लुप्त होऊ लागले असून याबाबत तक्रारी करूनही पुरातत्त्व खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. वसई किल्ल्यातील बालेकिल्ला बुरूज, जोसेफ चर्च, फ्रान्सिस्कन चर्च, गोन्सालो गार्सिया चर्च, डॉमिनिकन चर्च या ठिकाणी जवळपास १५० पेक्षा अधिक पोर्तुगीज कालखंडातील महत्त्वाचे व तारीखवार शिलालेख आहेत. या शिलालेखांतून पोर्तुगीज अधिकारी, सेनानी, जलवर्दी सैनिक, दानशूर महिला इत्यादींबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होते. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने यातील बहुतेक चर्चचे जतनीकरणाच्या नावाखाली नूतनीकरण केल्याने काही शिलालेख चक्क रेतीच्या ढिगाऱ्याखाली, तर काही माती आणि सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
त्याचप्रमाणे वसई किरवली येथील तलावात २०१२ साली ७६० वर्षांपूर्वीचा एक शिलालेख सापडला होता. हा शिलालेख इसवी सन १२६८ मधील शिलाहार साम्राज्याच्या काळातील असल्याचे इतिहासतज्ज्ञांनी सांगितले; पण आजतागायत हा शिलालेख असाच या तलावाच्या किनाऱ्यावर पडून आहे.
वसईतील अनेक पुरातन वास्तू दुरुस्तीच्या प्रतीक्षेत शेवटच्या घटका मोजत आहेत. नालासोपारा येथील बौद्ध स्तूप याचे उदाहरण आहे. शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने अनेक वेळा या स्तूपाच्या पुनर्विकासाचे दावे केले आहेत; पण आजतागायत कुठलेही काम या ठिकाणी झाले नाहीत. हा स्तूप दरवर्षी पावसाळय़ात खचत आहे. जर लवकरच या स्तूपाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर हा पूल नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक पुरातत्त्व वस्तू ह्यांची सरकारी दफ्तरी अजूनही साधी नोंदसुद्धा झाली नाही. यामुळे या वस्तू काळाच्या ओघात नष्ट होणार आहेत.
त्याचबरोबर वसई, विरार परिसराला २६ कि.मी.चा सागरी किनारा लाभला आहे. या सागरी किनाऱ्यावर दररोज मुंबई, ठाणे, इतर उपनगरांतून हजारो पर्यटक येतात; पण त्यांना साधी पिण्याच्या पाण्याचीसुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आली नाही. या ठिकाणी जाणारे रस्ते ग्रामपंचायतीच्या काळात बांधले असून अतिशय अरुंद आहेत. या भागात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पर्यटनाच्या नावाखाली या परिसरात शेकडो बेकायदा रिसोर्ट आणि हॉटेल चालवले जातात. यामुळे अनेक गैरधंदे वाढले आहेत. यात महाराष्ट्र पर्यटन विभाग पुरातत्त्व विभाग, महसूल विभाग, वसई- विरार महानगरपालिका, राजकीय मंडळी यांनी शहरात पर्यटन विकास व्हावा म्हणून कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. अनेक प्रकल्प निधीअभावी डागडुजी न झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
वसईतील जुचंद्र परिसरातील पाणजू बेट आणि विरारमधील जुली बेट पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव सप्टेंबर २०१८ रोजी आणला होता; पण मागील चार वर्षांत या प्रकल्प हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने या प्रकल्पाचा सर्वच आस्थापनांना विसर पडला आहे. या संदर्भात नेमके कुठे घोडे अडले याचीसुद्धा माहिती कुणाला नाही. यामुळे वसईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हा प्रकल्प फायलीच्या ढिगाऱ्यात गहाळ झाला. अशा अनेक योजना केवळ कागदावर रंगवून त्याचे सर्वेक्षण आणि इतर तरतुदीसाठी कोटय़वधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात एकही योजना मार्गी लावली नाही. यामुळे पर्यटनाच्या बाबतीत वसई तालुका नेहमीच उपेक्षित राहिला आहे.
वसईत जर पर्यटन क्षेत्राचा विकास झाला तर स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्नसुद्धा वाढू शकते. अनेक पर्यटक आणि अभ्यासक वसईत आल्याने देशभरात वसईची ख्याती निर्माण होऊ शकते. असे असतानाही केवळ प्रशासकीय आणि राजकीय उदासीनतेमुळे वसईचा इतिहास पुसला जाणार आहे.