लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: वसई विरार शहरात पालिकेकडून विविध ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम ही करून ठेवले आहे. मात्र या कामात नियोजनाचा अभाव असून खोदकाम केले रस्ते वेळीच दुरूस्त केले जात नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

वसई विरार महापालिकेला एमएमआरडीएच्या ४०३  दशलक्षलीटर सुर्या प्रकल्प योजनेतून १८५ दशलक्षलीटर पाणी मिळाले आहे. त्यामुळे वसई विरार भागात जलवाहिन्या टाकण्याचे कामांना वेग आला आहे. सुरवातीला महामार्ग तसेच मुख्य जलवाहिन्या टाकण्याची कामे पालिकेने पूर्ण केली होती.आता शहरांतर्गत जलवाहिन्या ही टाकल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला खोदकाम करून या वाहिन्या अंथरल्या जात आहेत. या खोदकामामुळे अनेक ठिकाणच्या भागात रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

निर्मळ- भुईगाव रस्ता, भुईगाव गावात जाणाऱ्या रस्ता, वाघोली, गिरीज अशा विविध ठिकाणच्या भागात रस्ते खणून त्या ठिकाणी जलवाहिन्या टाकल्या आहेत. मात्र जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर त्या रस्त्यांची वेळीच दुरुस्ती होणे गरजेचे आहे तसे होत नसल्याने येथून ये जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

काही ठिकाणी रस्ते खणून जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर व्यवस्थित न बुजविले नसून त्यावर असलेले केवळ दगड टाकून ठेवले आहेत. जेव्हा समोरून मोठी गाडी येते तेव्हा त्या खडकाळ भागातून प्रवास करताना अडचणी येतात. त्यात दुचाकी अडकून अपघात होण्याची शक्यता असल्याचे दुचाकीस्वार निखिल नाईक यांनी सांगितले आहे. पालिकेने व संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराला सांगून वेळेत दुरुस्ती करवून घेतली जाईल असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ठेकेदाराचा निष्काळजीपणा

रस्त्याचे खोदकाम करताना त्याची आवश्यक ती परवानगी घेणे गरजेचे आहे. याशिवाय ज्या ठिकाणी काम सुरू तिथे सूचना फलक, सुरक्षा उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तशा कोणत्याच उपायोजना केल्या जात नसल्याने आज त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे एखादी अपघाताची घटना घडून जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे काँग्रेस पर्यावरण सेल विभागाचे समीर वर्तक यांनी सांगितले आहे. याबाबत सातत्याने पालिकेकडे तक्रारी करतो मात्र पालिका ही त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दुचाकी स्वार घसरून पडण्याची भीती

जलवाहिन्या, विद्युत केबल टाकण्यासाठी रस्ते खणले जातात. काही ठिकाणी त्यानंतर दुरुस्ती केली जाते. परंतु ती दुरुस्ती अगदी थातूर मातूर स्वरूपाची असल्याने रस्त्यांची उंच सखल अशी स्थिती होते. अशा वेळी दुचाकीस्वार त्यावरून घसरून पडण्याची शक्यता आहे.