लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : नालासोपाऱ्याच्या आचोळे येथील रखडलेल्या रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी कोकण विभागीय आयुक्तांच्या बैठकीत जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आचोळे येथील या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्याचे दोन वेळा भूमीपुजनाही झाले होते. परंतु जागा ताब्यात नसल्याने रुग्णालयाचे काम रखडले होते.

वसई विरार शहरात पालिकेचे सुसज्ज रुग्णालय नाही. त्यामुळे नागरिकांना गंभीर आजारावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयात तसेच मुंबईला जावे लागते. वसई विरार महापालिकेने प्रभाग समिती ‘ड’ मधील आचोळे येथील आरक्षण क्रमांक ४५५ व सर्वे नंबर ६ येथील दोन एकर जागेत २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विविध प्रकारच्या अडचणीमुळे रुग्णालयाचे काम रखडले होते.

८ जुलै २०२४ रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने रुग्णालयासाठी २५० कोटी रुपये निधी मंजूर केले होता. त्यामुळे रुग्णालयाचे काम मार्गी लागेल असे वाटले होते. त्यातच आता ज्या जागेत रुग्णालय उभारले जाणार आहे ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. ही जागा सत्र न्यायालय व न्यायाधीश निवास स्थान बांधण्यासाठी नियोजित करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे आता पालिकेने रुग्णालयात उभारणीसाठी आरक्षित केलेल्या जागेचा पेच निर्माण झाला आहे.

एकीकडे रुग्णालय उभारणीच्या कामाला निधी मंजूर आहे. परंतु जागा नाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुसज्ज रुग्णालयाचे काम आणखीन लांबणीवर पडले होते. नालासोपार्‍याचे आमदार राजन नाईक यांनी ही अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी यासाठी सोमवारी विभागीय कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी ही बैठक पार पडली.

या बैठकीत विभागीय कोकण आयुक्त विजय सुर्यवंशी पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर, आमदार राजन नाईक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील चर्चेनंतर जिल्हाधिकारी जाखर यांनी सदर रूग्णालय उभारण्यासाठी लागणारी जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले. यामुळे जागा हस्तांतरणाचा तिढा सुटला असून रुग्णालयचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार राजन नाईक यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या कामाचे तीन वेळा भूमिपूजन

मागील ५ वर्षांपासून विविध राजकीय पक्ष यांच्या मार्फत केवळ रुग्णालयाच्या भूमीपूजन करण्याचा सपाटा सुरू आहे. १९ ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याला तीन वर्षे उलटून गेल्यानंतर १० जुलै २०२४ रोजी पुन्हा एकदा भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्याच दिवशी बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन आमदार क्षितीज ठाकूर यांनी सुध्दा रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते.