दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे, ४५ शाळांची दुरवस्था

वसई : वसईतील बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांचे दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणच्या भागात शाळांना गळती  लागण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. नुकताच विरार पूर्वेतील उर्दू शाळेलासुद्धा गळती लागली असल्याने विद्यार्थ्यांंना बसण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. वसईतील ४५ शाळांची छत गळतीची समस्या आहे.

विरार पूर्वेतील भागात जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे.  ही शाळा सर्व शिक्षा अभियानांतर्गत उभारण्यात आली होती. यात पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  परंतु सध्या स्थितीत  शाळेच्या स्लॅबमधून पाणी गळती होत असल्याने शाळेची दुरवस्था होऊ लागली आहे.  पाणी वीजवाहक तारांत गेल्याने शॉट सर्किट होऊन पंखे ही बंद पडले आहेत. यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. चार वर्षांंपूर्वी या शाळेच्या दुरुस्तीसाठी चार लाख ७५ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मात्र अजूनही हा निधी मिळाला नसल्याने याची दुरुस्ती झाली नसल्याचे माजी नगरसेवक अब्दुल रहेमान बलोच यांनी सांगितले. तर दुसरीकडे नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या दोन वर्षांंतच या शाळेची दुरवस्था झाली आहे.  पाणी वीज वाहिन्या व मीटरमध्ये जात असल्याने विजेचा धक्का लागून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खिडक्या, भिंत व इतर ठिकाणी तडे गेले आहेत. तर काही भागातील काँक्रीट निखळून खाली पडले आहे.

निधीअभावी दुरुस्तीत अडचणी

वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना छत गळती लागली आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा स्तरावरून निधीच उपलब्ध होत नसल्याने या शाळांची दुरुस्ती कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत वसईतील ४५ शाळांची छत गळतीची समस्या आहे. याची अभियंता यांच्यामार्फत पाहणी करून त्यासाठी लागणारा अंदाजे खर्च याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. परंतु निधी अजूनही मिळाला नाही यासाठी आता सर्व शिक्षा अभियानांतर्गत जो काही निधी मिळाला त्यातील जेवढा शक्य तितका खर्च करून या शाळांची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती तालुका शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. ज्या शाळांची छत गळती होत आहे. त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. लवकरच त्या शाळांची दुरुस्ती करण्यात यावी  यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

—माधवी तांडेल, गटशिक्षणाधिकारी, वसई.

Story img Loader