भाईंदर :- भाईंदरच्या देवल नगर परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये वाटपासाठी आलेल्या विदेशी मद्य आणि मासळीचा साठा भाईंदर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी रिक्षाचालकासह एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा कार्यकर्ता गीता जैन चा असल्याचा आरोप भाजपने केल्याने राजकीय वातावरण पेटले आहे.
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगर परिसरात मद्य आणि मासळीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती भाईंदर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भाईंदर पोलिसांचे एक पथक गणेश देवल नगर परिसरातील खाडी किनाऱ्यावर तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी तेथे त्यांना एक रिक्षा संशयास्पदरित्या दिसून आली.या रिक्षाची तपासणी केली असता त्यात असलेल्या चार बॉक्स मध्ये १९२ दारूच्या बाटल्यात आणि चार किलो मासळी आढळून आली. याबाबत रिक्षा चालक लालजी राजभर यांच्याकडे विचारणा केली असता त्याने इरफान पठाण नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून मिरारोड येथून मद्य आणि मासळी घेऊन आला असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी मद्य व मासळी चा साठा जप्त करत, रिक्षा चालक राजभर तसेच इरफान पठाण याच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलमाअतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणानंतर राजकीय वातावरण पेटले आहे.गुन्हा दाखल असलेला आरोपी इरफान पठाण हा अपक्ष उमेदवार गीता जैन यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपने केला आहे. जैन समर्थकांनी मात्र याचा इन्कार केला आहे.