लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : मिरा भाईंदर शहरात एकूण ५ शाळा या बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या असून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच अनधिकृत शाळांचे प्रमाणही वाढले आहे. विविध ठिकाणच्या भागात शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता सरार्सपणे अनधिकृत शाळा चालविल्या जात आहेत. यामुळे पालक व विद्यार्थी यांची फसवणूक होत असते.
याला रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण करून त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मागील वर्षात शहरात सात अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले होते. तर यंदा पाच शाळाची यादी महापालिकेन नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पाचही इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा समावेश आहे.या शाळांना नोटिसा काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी दीपाली जोशी यांनी दिल्या आहेत.
झोपडपट्टी परिसरात प्रमाण अधिक
मिरा भाईंदर शहरात अनधिकृत शाळाची संख्या ही प्रामुख्याने झोडपट्टी परिसर व आदिवासी पाड्यात सर्वाधिक आहे. याठिकाणी अनधिकृत बांधकाम उभारून शाळा सुरु केल्या जातात.महापालिकेकडून दरवर्षी अशा शाळांचे सर्वेक्षण करून त्यांना अनधिकृत घोषित करण्याचे काम केले जाते.परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने त्याच ठिकाणी नाव बदलून दुसरी शाळा सुरु करण्यात येत असल्याचा धक्का दायक प्रकार घडत असतो.
मिरा भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून २०२४-२५ दरम्यान एकूण १० अनधिकृत शाळा निश्चित केल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष आता प्रशासनाने अनधिकृत शाळाची यादी घोषित केल्यानंतर त्यात केवळ ५ शाळाचा समावेश असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे अन्य पाच शाळांना कोणत्या आधारावर यादीतून वगळण्यात आले याबाबतचे ठोस स्पष्टीकरण शिक्षण विभागाकडून दिले जात नाही आहे.
शिक्षण विभागात इतर महत्वाच्या पदांची कमतरता.
मिरा भाईंदर महानगरपालिकेचे स्वतंत्र शिक्षण विभाग आहे. या शिक्षण विभागासाठी वर्ग एक पदाचा शिक्षण अधिकारी असावा म्हणून पालिकेने काही वर्षांपूर्वीच आकृतीबंध नियमात याची मान्यता घेतली आहे.त्यानुसार या ठिकाणी शासनाकडून शिक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांसह उप-शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख,विस्तार अधिकारी असे महत्वाच्या पदाची पालिकेने अदयापही मंजुरी घेतलेली नाही.त्यामुळे शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता निर्माण झाली असून याचा दुष्परिणाम विद्यार्थी शोध मोहीम आणि बेकायदेशीर शाळांवर कारवाई अश्या कामावर होऊ लागला आहे.
शहरातील ५ अनधिकृत शाळा
१. विराज स्कुल- काशिमीरा ( माशाचा पाडा)
२. कनकधारा इंग्लिश स्कूल-भाईंदर
३. ट्रिनिटी स्कूल- काशिमीरा ( काजूपाडा)
४. नोवा स्कूल – काशिमीरा (डाचकुलपाडा )