भाईंदर : वसई-कल्याण दरम्यान प्रस्तावित जलवाहतुकीसाठी भाईंदरच्या जेसल पार्क येथे उभारल्या जाणाऱ्या जेट्टीला स्थानीकांनी जोरदार विरोध केला आहे. या जेट्टीला परवानही आणण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाला ३ वर्ष लागली होती. विरोधामुळे जेट्टीसाठी नवीन ठिकाण शोधणे, त्याला नव्याने परवानगी आणणे या प्रक्रियेत आणखी काही वर्ष लागू शकतील. त्यामुळे याप्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई व उपनगरात वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून पर्यावरणपूरक असलेल्या जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यानुसार वसई ते कल्याण अशा चार महानगरपालिका क्षेत्राला जोडणारी जलमार्गीका (जलमार्ग क्रमांक -५३) सुरू केली जात आहे.या मुळे वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांचा जलद गतीने प्रवास होणार आहे. त्यानुसार वसई ते कल्याण जलवाहतूकी दरम्यान वसई, मिरा भाईंदर, घोडबंदर, नागला बंदर, काल्होर, पार्सीक, अंजूर दिवे, डोंबिवली, कल्याण अशा दहा ठिकाणी जेट्टी व तत्सम सुविधा उभरण्याच्या प्रकल्पास केंद्र शासनाच्या शिपिंग बोर्ड ने २०१७ साली मंजुरी दिली आहे. तर सदर काम हे महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत केले जात आहे.
यात पहिल्या टप्प्यात डोंबिवली, मिरा भाईंदर, कोलशेत आणि काल्होर या चार ठिकाणी जेट्टी उभारण्याच्या कामाचे कार्यादेश कंत्राटदाराला देण्यात आले आहे. यासाठी पर्यावरणाच्या परवानग्या इतर प्रक्रिया पूर्ण करून डोंबिवली, कोलशेत आणि काल्होर अशा तीन ठिकाणी कामास सुरुवात देखील करण्यात आली आहे.मात्र यातील मिरा भाईंदर च्या जेसल पार्क चौपाटी जवळ असलेल्या ‘नवीन धक्या’च्या ठिकाणी नागरिकांचा विरोध होत असल्यामुळे हे काम रखडले आहे. परिणामी २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करून घेण्याचे उद्दीष्ट पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
जेट्टीला विरोध का ?
वसई-कल्याण जलमार्गीकेसाठी मिरा भाईंदरच्या जेसल पार्क चौपाटीवर ‘नवीन धक्का’ या ठिकाणी जेट्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत चे कार्यादेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. मात्र सदर ठिकाणी मोठ्या संख्यने मूर्तींचे विसर्जन केले जाते. तसेच या भागात नागरी रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. याच भागात उद्यान व विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. परिणामी याठिकाणी जेट्टी उभारून वाहतूक सेवा सुरु केल्यास याचा वाईट परिणाम स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. त्यामुळे या जेट्टीला स्थानिकांचा विरोध आहे.
आमदारांकडून पर्यायी जागेची सुचना
भाईंदरच्या जेसल पार्क चौपाटीजवळ असलेल्या नवीन धक्क्याच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यास स्थानिक नागरिकांबरोबर आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील विरोध केला आहे. यावरून त्यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाला पत्र पाठवले. जेसल पार्क ऐवजी याच मार्गांवरील कोळीनगर येथे जेट्टी उभारण्याची सुचना त्यांनी केली आहे. मात्र यावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
प्रकल्पाला आणखी विलंब होणार
भाईंदर येथील ‘नवीन धक्का’ येथे जलवाहतुकीसाठी जेट्टी उभारण्यास महाराष्ट्र सागरी मंडळाला पर्यावरणीय व इतर आवश्यक परवनाग्या घेण्यास तीन वर्षाहून अधिकचा कालावधी लागला आहे. अशा वेळी या जेट्टीचे ठिकाण बदल्यास मंडळाला नव्याने परवानगी प्राप्त करण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागु शकतो.परिणामी याचा वाईट परिणाम संपूर्ण जलवाहतुक प्रकल्पावर होणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.