लोकसत्ता प्रतिनिधी 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई: मागील काही महिन्यांपासून वाहनचालक नियुक्ती व इतर तांत्रिक अडचणीमुळे रस्ते सफाई वाहने जागीच उभी होती. आता वाहनचालक यांची नियुक्ती झाली असल्याचे अखेर रस्ते सफाई वाहने स्वच्छतेसाठी रस्त्यावर आणली आहेत. वसई विरार शहराचे नागरीकरण वाढू लागले आहे. यासोबतच वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यातच आता विविध ठिकाणच्या भागात विकासकामे ही झोमाने सुरू आहेत.

रस्त्यावर मालवाहतूक करणारी वाहने व इतर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातून पडणारी माती व त्याच्या चाकांना लागून येणारी धूळ माती यामुळे शहरातील मुख्य रस्ते व शहराच्या अंतर्गत रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढत आहे. ही धूळ नियंत्रण व्हावी  यासाठी  पालिकेने केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या ४ कोटी २९ लाख रुपये इतका निधी खर्च करून पाच नवीन रस्ते सफाई यंत्र वाहने खरेदी केली आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून ही यंत्र चालविण्यासाठी वाहनचालक यांची नियुक्ती झाली नसल्याने ही वाहने जागच्या जागी धूळखात उभी होती.

आणखी वाचा-मॅरेथॉनसाठी वसई विरार महापालिका सज्ज

शहरात धुळीचे साम्राज्य वाढत आहे असे असताना ही यंत्रणा पालिकेने सुरू करून सर्व ठिकाणच्या भागात कार्यरत करणे गरजेचे होते. तसे न झाल्याने शहरातील प्रदूषण नियंत्रण कसे करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. याशिवाय दैनिक लोकसत्ताने सुद्धा १ सप्टेंबर  व १८ नोव्हेंबर २०२३ मध्ये “पालिकेची रस्ते सफाई यंत्रणा धूळखात व सफाई यंत्रासाठी वाहनचालकांची प्रतीक्षा” या मथळ्याखाली वृत्त प्रसारित करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.

अखेर पालिकेच्या आस्थापना विभागाने वाहनचालकांची नियुक्ती केली आहे. शुक्रवारी पासून वसई विरार महापालिकेची रस्ते सफाई यंत्र स्वच्छतेसाठी  वापरण्यास सुरवात झाली असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

धूळ नियंत्रणासाठी पालिकेचे प्रयत्न

वसई विरार महापालिकेच्या ताफ्यात सद्यस्थितीत सात रस्ते सफाई यंत्र आहेत.या यंत्राद्वारे मुख्य रस्ते, रस्त्याच्या कडा अशा ठिकाणी स्प्रिंकल द्वारे पाणी शिंपडून रस्त्याची स्वच्छता केली जाणार आहे. यामुळे रस्त्यावर हवेत उडणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण नियंत्रणास मदत होणार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta impact mechanical cleaning of roads finally started in vasai virar municipal area mrj