भाईंदर :- ऑनलाईन जुगारात पैसे हरल्याने कर्जबाजारी झालेल्या तरुणाने चक्क चोरीचा मार्ग निवडला. एका वृद्ध महिलेला घरात डांबून तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याने चोरल्या. मात्र नयानगर पोलिसांनी आरोपीला ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या.
मिरा रोडमध्ये ७२ वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल आठ तास घरात डाबून ठेवून तीच्या बांगड्या घेऊन फरार झालेल्या चोराला पकडण्यात नया नगर पोलिसांना यश मिळाले आहे. ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.
नया नगर येथील लक्ष्मी पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फातीमा जुवाले (७२) नामक वृद्ध महिला एकट्याच घरी राहतात. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास एक इसम इलेक्ट्रिशन असल्याचे सांगून महिलेच्या घरात घुसला. आणि त्याने घराचे दार आतून लावून घेतले. महिलेला इसमावर लगेचच संशय आल्याने तिने आरडा- ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोराने महिलेला मारहाण करून गप्प केले. घरात शोधाशोध केल्यानंतरही काही न सापडल्यामुळे त्याने वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी काढून घेतली. मात्र इमारतीखालील दुकाने सुरू असल्यामुळे पळ काढणे कठीण होणार असल्याचे लक्षात येताच त्याने तब्बल आठ तास घरात तळ ठोकला. तसेच याबाबतची माहिती कोणाला दिल्यास पुन्हा येऊन जीव मारणार असल्याची तो भीती दाखवत होता. या दरम्यान त्याने अनेक वेळा महिलेला मारहाण करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला. सकाळी पाचच्या सुमारास चोराने पळ काढला. परंतु जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला सकाळी उशिरा जाग आली. या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी सायंकाळच्या सुमारास नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा – वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने ४८ तासाच्या आत आरोपीला अटक केली. मोहम्मद सलीम चौधरी असे या आरोपीचे नाव आहे. तो तय्यब ज्वेलर्स नामक एका कंपनीचा कर्मचारी आहे. गेल्या काही महिन्यात ऑनलाईन जुगार खेळात ३ लाख गमावले होते. यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.