जागतिक पातळीवर निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने आर्थिक नुकसान
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात सातत्याने भासत असलेला लशींचा तुटवडा दूर करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून जागतिक पातळीवर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र या निविदेप्रक्रियेला योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे पालिकेला तब्बल २५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.
मीरा-भाईंदर शहरात करोना आजाराने गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे.यात दुसऱ्या लाटेचा गंभीर फटका पालिका प्रशासनाला बसला आहे. अशा परिस्थितीत करोनाचा प्रसार आटोक्यात आणण्याकरिता विविध स्वरूपाच्या उपाययोजना आखण्यात येत असून अद्यापही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याकडे प्रशासनाकडुन अधिक भर देण्यात येत आहे. मात्र लशींचा पुरेश्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.यावर कायम स्वरूपी तोडगा म्हणून मुंबई महानगरपालिकेप्रमाणे मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने देखील चार लाख लस खरेदी करण्याकरिता जागतिक पातळीवर निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार जागतिक पातळीवर प्रकाशित होणाऱ्या दै. फायनान्शिअल टाइम्स आणि दै. न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याकरिता तब्बल २५ लाख रुपये खर्च अपेक्षित ठेवण्यात आला होता. मात्र दोन वेळा निविदा प्रक्रियेला मुदत वाढ देऊन देखील योग्य प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेची निराशा झाली आहे.तसेच एकीकडे शहरात दिवसेंदिवस लशीची समस्या अधिक तीव्र होत असून दुसरीकडे आर्थिक संकटात असलेल्या पालिकेचे २५ लाख रुपये वाया जात असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.तर या संदर्भात प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्याकरिता पालिका जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो स्वीकारला नाही.
मीरा-भाईंदर महानगरपालिका पूर्वी पासून मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडली आहे. मात्र केवळ इतर महानगरपालिका प्रमाणे स्वत:चा मोठेपणा दाखवण्याच्या स्वभावामुळे अधिक २५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सामान्य नागरिकांना सहन करावे लागत आहे.”
-रोहित सुवर्ण, सामाजिक कार्यकर्ते