‘वसई फर्स्ट’च्या माध्यमातून सर्व पुस्तके विनामूल्य इंटरनेटवर
सुहास बिऱ्हाडे
वसई: ‘गाणारे प्रिन्स’, ‘युसिक्केचे सात मित्र’ ‘देन्सीसुच्या गोष्टी’ ‘खिशातला कुत्रा’ ‘लाल टेकडी’ ‘दोन भाऊ’ ‘रशियन लोककथा’, ‘मिशा मासिक’, विविध सोपी विज्ञान आणि गणिताची अशी आकर्षक छपाईची, सुंदर चित्रे असणाऱ्या छोटय़ा रशियन पुस्तकांनी शाळकरी मुलांना १९८० च्या दशकात भुरळ घातली होती. या रम्य, जादुई दुनियेत सध्याच्या लहान मुलांनाही रमता यावे, यासाठी ‘वसई फर्स्ट’ या संस्थेने ही सर्व पुस्तके इंटरनेटच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
किशोर, चांदोबा, चंपक या गोष्टींच्या पुस्तकांबरोबरच रशियन कथांच्या सचित्र पुस्तकांचेही लहान मुलांमध्ये पूर्वी आकर्षण होते. ८०-९०च्या दशकात बाल, किशोर वयात असलेल्या मुलामुलींवर या कथांनी गारूड केले होते. वाय पेरेमानचे ‘बीजगणित’, ‘भूगोलशास्त्र’, धातूलच्या नवलकथा, ‘रशियन लोककथा’, ‘लाल तुरेवाला कोंबडा’, सेगेई अक्साकोव यांचे ‘छोटे शेंदरी फुल’ हॅलो म्यान्द यांचे ‘खिशातला कुत्रा’, नदेज्दी कालिनिाना यांचे ‘चला जाऊ बालवाडीला’ बिताली बिओकी यांचे ‘पहिली शिकार’ सिल्वी व्याल्याल यांचे ‘युस्सिकेचे सात मित्र’, अर्कादी गैदार यांचे ‘दोन भाऊ’, अलेक्सेई लेओनोव यांचे ‘सूर्यावर स्वारी’, वासिली सूखोम्लीन्हस्की यांचे ‘गाणारे पिन्स’ धातूलच्या नवलकथा अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध होती. ‘मिशा’ नावाच्या मासिकावर मुलांच्या उडय़ा पडायच्या. मूळ रशियन भाषेतील ही पुस्तके मराठीतून राडुगा प्रकाशन, लोकवाड्.मयगृह यांनी आणली होती. सोव्हिएत संघातून ही पुस्तके मराठी भाषेतून छापून भारतात विकली जात होती. रशियाचे विभाजन होण्यापू्वी सोव्हिएत संघ साहित्य, कला आणि संस्कृतीत अग्रेसर होता. ही पुस्तके आता कालबाह्य झाली आहेत. ती आजच्या मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्धार वसई फर्स्ट या सामाजिक संघटनेने केला आहे. वसई फर्स्ट या संघटनेनेच अध्यक्ष चिन्मय गवाणकर यांनी सांगितले की, माझ्या लहानपणी या पुस्तकांची जी मोहीनी होती ती माझ्या मुलीवर तेवढीच आहे. माझ्या संग्रही अशी अनेक रशियन पुस्तके असून ती उत्तम स्थितीत आहे, असे ते म्हणाले.
पुस्तके देण्याचे आवाहन
रशियन पुस्तकांचा दर्जा उत्कृष्ट आहे. सुबक रचना, आकर्षक छपाई आणि उत्तम बांधणी यामुळे ४० वर्षांनंतरही ही पुस्तके टिकून आहेत. ज्यांच्या घरी ही पुस्तके आहेत त्यांनी वसई फर्स्ट या संस्थेला दिली तर ती स्कॅन करून परत देण्यात येतील, असे आवाहन संस्थेने केले आहे. पुस्तके मिळाली तर आताच्या शाळकरी मुलांना साहित्याचा आनंद घेता येईल आणि वाचनाची गोडी रुजेल, असा विश्वास संस्थेच्या चिन्मय गवाणकर यांनी व्यक्त केला आहे. पुस्तकांना ४० वर्ष होऊन गेल्याने कॉपी राईटचा प्रश्न नाही. विखुरलेली पुस्तके एकाच ठिकाणी वाचकांना मिळू शकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.