वसई- भाईंदर खाडीत राज्यातील पहिला डबल डेकर पूल तयार केला जाणार आहे. एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वे आणि खाली वाहनांसाठी पूल असणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिला पूल असणार आहे. या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिली आहे. यामुळे वसईतील मेट्रोचा मार्गही सुकर झाला आहे. दोन्ही पूल एकाच मार्गातून असल्याने खर्चातही बचत होणार आहे.
वसई शहरात मेट्रो आणण्यासाठी मेट्रोमार्ग १३ ची घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत मीरा-भाईंदर ते वसई-विरार हा मेट्रो मार्ग जोडण्याचा निर्णय घेतला आहे. वसई, विरारची एकूण लोकसंख्या आणि मीरा-भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्षात घेऊन हा मेट्रो मार्ग हाती घेण्यात येणार आहे. मीरा रोड ते विरार हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग असून, त्यात २० स्थानकांचा समावेश आहे. वसई विरार शहरासाठी मेट्रोला मान्यता मिळाली असली तरी मध्ये खाडी असल्याने मेट्रो आणायची कुठून असा प्रश्न होता. त्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू होता. सध्या जेनएपीटी बंदराचे काम सुरू आहे. तेथे मेट्रो प्रकल्प आहे. तेथून मेट्रो पालघर वसईपर्यंत आणण्याचा एक पर्याय होता. परंतु इतर मार्ग खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पूलावरून मेट्रो आणावी असा प्रस्ताव आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिला होता. आमदार क्षिजीत ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी यासाठी पाठपुरवा सुरू केला होता. अखेर एमएमआरडीएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
भाईंदर नायगांव मेट्रोसहित खाडीपूल करण्याबाबतचा संरचनात्मक आराखडा तयारीचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. वरील अनुषंगाने भाईंदर वसई पूलाचा आराखडा व संरचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल डिझाईन) प्राधिकरणाच्या दळणवळण विभागाकडे अग्रेसित करण्यात आलेला आहे, वसई खाडीवर मेट्रो (मेट्रो मार्ग १३) सहित खाडीपूलाच्या कामाच्या प्रस्तावाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अ.सु. तितरे यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
हेही वाचा – अंबरनाथमध्ये ३५ वर्षांच्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मेट्रोच्या खर्चात होणार बचत
या प्रकल्पासाठी यापूर्वीच दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनची सल्लागार (डीएमआरसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर या शहरात सध्या मेट्रो मार्गाचे स्थापत्य काम चालू असून त्याच मार्गाला हा वसई-विरार मेट्रो मार्ग जोडला जाणार आहे. आता भाईंदर खाडीत प्रस्तावित पूल आणि मेट्रो एकाच ठिकाणाहून जाणार आहे. वर मेट्रो आणि खाली वाहनांसाठी पूल अशी त्याची रचना आसणार आहे. एकाच खांबावर दोन्ही मार्ग असणार आहेत. यामुळे खर्चात देखील बचत होणार असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले. अशा प्रकारचा हा राज्यातील पाहिला प्रकल्प असणार आहे.
© The Indian Express (P) Ltd