वसई: विरार मध्ये एका शिक्षिकेच्या घराला आग लागल्याची घटना घडली आहे.  या आगीत घरी तपासणीसाठी बारावी वाणिज्य शाखेचे आणलेल्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहे. यात सुमारे १७० हून अधिक उत्तरपत्रिका जळून गेल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

विरार पश्चिमेच्या नानभाट रस्त्यावर असलेल्या गॉड ब्लेस बंगला येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या होत्या. घरात कोणी नसताना १० मार्च रोजी दुपारच्या सुमारास शॉट सर्किट होऊन घराला आग लागली होती. या आगीवर वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते.

 या आगीत घरातील साहित्यासह सोफ्यावर ठेवलेल्या बारावी वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका ही जळून खाक झाल्या आहेत. या प्रकाराची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर ही घटना उघड झाली आहे. या आगीत सुमारे १७० हून अधिक उत्तरपत्रिका जळून गेल्या असल्याची माहिती मिळत आहे.

ज्या शिक्षिकेने या उत्तरपत्रिका घरी आणल्या होत्या ती उत्कर्ष विद्यालय ज्युनिअर कॉलेज ची शिक्षिका आहे. घटनास्थळी बोळींज पोलिसांनी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा करून याची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे. पुढील तपास ही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. उत्तर पत्रिका जळून गेल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विद्यार्थी व पालक वर्गात चिंता

बारावीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्याच्या घटनेनंतर विद्यार्थी व पालक यांच्या मधून चिंता व्यक्त केली जात आहे. नेमक्या या उत्तर पत्रिका कोणत्या भागातील आहेत ? आग लागली की लावली गेली ?  याशिवाय अशा प्रकारे उत्तरपत्रिका घरी तपासणी करण्यासाठी आणता येतात का असा प्रश्न ही आता विचारला जाऊ लागला आहे.

Story img Loader