वसई : विरारमध्ये राहणाऱ्या एका नवविवाहितेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या महिलेचा पती फरार आहे. विरार पूर्वेच्या शंकर पाडय़ातील जीवदानी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रियंका उर्फ पिंकी पाटील (२५) हिचा मृतदेह १ फेब्रुवारी रोजी आढळला होता. या प्रकरम्णी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तिचा पती फरार असल्याने पोलिसांना संशय आला. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या झाल्याचे उघड झाले.
दरम्यान या महिलेच्या फरार पतीने व्हाट्सअपच्या स्टेट्सवर आईवडिलांना उद्देशून ‘मला माफ करा, मी काही वेगळे काम करणार आहे’ असा संदेश ठेवला होता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. दरम्यान या प्रकरणी विरार पोलिसांनी त्याचा साधीदार संकेत राऊत याला अटक केली आहे. आरोपी पती हा चालक होता आणि नुकतीच त्याची नोकरी गेली होती. दरम्यान, तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करत होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.