वसई: सुधारित महात्मा फुले जनआरोग्य योजनेअतंर्गत असलेल्या रुग्णालयांना शस्त्रक्रियांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रुग्णालयांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्य रुग्णांवर अधिक चांगल्या पध्दतीने मोफत उपचार केले जाऊ शकणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना गंभीर आजारावर मोफत उपचार देण्यासाठी राज्य शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत १ हजार ३५६ आजारांवर दिड लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतात. १ हजारांहून अधिक खासगी रुग्णालयात ही योजना लागू करण्यात आली आहे.. १ जुलै २०२४ पासून संपूर्ण राज्यात सुधारीत महात्मा फुले जनआरोग्य योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली असून शिधापत्रिकेची अट काढण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना योजना खुली झाली असून ५ लाखांपर्यंतच्या उपचारांचा खर्च मोफत केला जात आहे. ज्या रुग्णालयात केंद्र शासनात आयुष्यमान भारत योजना लागू आहे तेथे ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंर्तगत रुग्णांना ५ लाखांचा उपचारांचा खर्च मोफत करण्यात येणार आहे. त्यातील साडेतीन लाख रुपयांचा भार राज्य शासन उचलणार आहे तर दीड लाखांचा खर्च विमा कंपनी करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वसई विरार शहरात वाहने झाली उदंड, वाहतूक कोंडीच्या समस्येत भर; वर्षभरात ८४ हजार वाहने रस्त्यावर

या योजनेअंतर्गत जी रुग्णालये येतात त्यांना जुन्या दरानुसार शस्त्रक्रियेचे दर राज्य शासनाकडून दिले जातात. त्यात वाढ करण्याची मागणी रुग्णमित्र सातत्याने करत होती. त्यामुळे नाईलाजाने रुग्णालये या योजनेअंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करत होते. अनेक रुग्णालयांना खर्चाचा परतावा देखील शासनाकडून वेळेवर मिळत नव्हता. मात्र आता राज्य शासनाने रुग्णालयांना शस्त्रक्रियेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १ हजार ३५६ आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाते. नव्या शासन निर्णयानुसार या शस्त्रक्रियांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा : दोन दिवसात एकाच कुटुंबातील ७ जण बेपत्ता, नालासोपारा पोलिसांनी लावला छडा

आम्ही गेली अनेक वर्ष यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करत होतो. सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार केले जातात तर रुग्णालयांनाही त्यांचा योग्य मोबदला मिळायला हवा अशी आमची मागणी होती. उशीरा का होईना पण शासनाने ती मागणी मान्य केल्याबद्दल रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma phule jan arogya yojana rates of surgeries increased by 15 to 20 percent for hospitals css