|| प्रसेनजीत इंगळे
एक लाख १२ हजार ४५१ पैकी ९९० करोना रुग्णांना लाभ
विरार : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा वर्षभरात केवळ ९९० करोनाग्रस्त रुग्णांना लाभ मिळाला आहे. एकीकडे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १२ हजार ४५१ रुग्ण करोनाग्रस्त आढळून आले आहेत. असे असतानाही केवळ ०.८८ टक्के रुग्ण या योजनेत लाभार्थी ठरले आहेत. त्यामुळे योजनेंतर्गत अधिग्रहित केलेल्या रुग्णालयात रुग्णांना उपचार नाकारले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील दोन वर्षांभरापासून जिल्ह्यात करोनाने थैमान घातले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण हे दुसऱ्या लाटेत आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अधिक होते. यामुळे नागरिकांना उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागत होते.
त्यात खासगी रुग्णालये उपचारासाठी चाचण्या आणि औषधे यांचा भरमसाट वापर दाखवून रुग्णाची लाखो रुपयांची देयक करून त्यांची आर्थिक लूट करत आहे. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेखाली रुग्णावर मोफत उपचार केले जात होते. मात्र या योजनेचा केवळ ९९० रुग्णांना लाभ घेता आला. जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्येच्या ६५ हजार ७९० रुग्ण वसई-विरार नगरपालिका क्षेत्रात आहेत. या योजनेअंतर्गत वसई-विरार परिसरात जनसेवा रुग्णालय, दत्तानी, वसई पश्चिाम, बदर रुग्णालय, नालासोपारा पश्चिाम, स्टार रुग्णालय, पाटणकर पार्क, नालासोपारा पश्चिाम, अलायन्स रुग्णालय, नालासोपारा पूर्व, विजयालक्ष्मी रुग्णालय, नालासोपारा पूर्व, तर पालघरमध्ये ढवळे मेमोरियल रुग्णालय, पालघर पश्चिाम यांचा समावेश करण्यात आला होता. या योजनेंतर्गत एकूण खाटांच्या २५ टक्के खाटा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण बहुतांश रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत रुग्ण दाखलच करून घेतले नाहीत. योजनेचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचा ठपका ठेवत, या रुग्णालयांनी रुग्णालयात केवळ नाममात्र रुग्णांना या योजनेच लाभ दिला आहे.
आरोग्यमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन
या संदर्भात माहिती देताना क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. वैभव गायकवाड यांनी माहिती दिली की, प्रत्येक रुग्णालयात या योजनेचे आरोग्यमित्र सर्व रुग्णालयात उपलब्ध आहेत. रुग्णांनी भरती झाल्यानंतर २४ तासांच्या आत या योजनेसाठी संपर्क करणे गरजेचे आहे. अनेक वेळा रुग्णांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेवर केली जात नाही. अनेक वेळा रुग्ण दाखल झाल्यानंतर डॉक्टरांची देयके आल्यानंतर संपर्क साधतात. तसेच काही रुग्ण इतर जिल्ह्यांत जाऊन उपचार घेतात. त्यामुळे अनेकांना याचा लाभ मिळत नाही. तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण दाखल करताना रुग्णालयातील आरोग्यमित्रांना संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.