वसई: वसई विरार मधेच कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांनी महावितरणचे ८६ कोटी ५० लाख रुपये थकविले आहेत. या थकीत देयकांची रक्कम अभय योजनेतून वसूल करण्यासाठी महावितरणने प्रयत्न सुरू केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई विरार मध्ये महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत महावितरणचे १० लाख ५०० इतके वीज ग्राहक आहेत. यापूर्वी काही वीज ग्राहकांनी महावितरणचे वीज देयक न भरल्याने महावितरणने त्यांच्या कायमस्वरूपी वीज जोडण्या खंडित केल्या आहेत. यात २०० एच पी पॉवरच्या वीज जोडण्या असलेले ४९ औद्योगिक वीज ग्राहकांनी १२.५० कोटी तर घरगुती व अन्य २१ हजार वीज ग्राहकांनी ७४ कोटी रुपये अशी एकूण ८६.५० कोटी रुपये इतकी रक्कम थकीत राहिली आहे.

हे ही वाचा… महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या

कोट्यवधी रुपयांच्या घरात वीज देयकांची रक्कम थकीत राहिली असल्याने महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी आता कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही अभय योजना लागू केली आहे. या योजनेतून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत देयकांच्या रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ होणार आहे.

अशी मिळणार योजनेची सवलत

या योजनेचा लाभ ३१ मार्च २०२४ पर्यँत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकांना घेता येणार आहे. यात मूळ देयकाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरता येणार आहे. तर देयकांची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के तर लघुदाब ग्राहकांना १० टक्के सवलत तर ग्राहकाने एकरकमी व ३० टक्के रक्कम भरल्यास तात्काळ नवीन वीज जोडणी , पुनर्जोडणी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे महावितरणने सांगितले आहे.

हे ही वाचा… Maharashtra News Live: “भगवी टोपी घातलेल्या लाखो लोकांमध्ये आजही अजान होते”, अमोल मिटकरींनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ!

नोटिसा बजावणार

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांची रक्कम वसूल करण्यासाठी पथके नियुक्त केली जाणार आहेत. प्रत्येक ग्राहकांच्या पर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी त्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत असे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे. तसेच या लागू केलेल्या अभय योजनेचा ग्राहकांनी लाभ घेऊन थकीत वीज देयकांचा भरणा करून वीज पुरवठा पूर्ववत करावा असे आवाहनही खंडारे यांनी केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran cut electricity supply of 21 thousand consumers in vasai virar due to non payment of electricity bill asj