वसई : वसईत उघड्या वीज पेट्या व संच यामुळे अपघाताच्या घटना समोर आल्या होत्या. याबाबत मानवी हक्क आयोगाने फटकारल्या नंतर महावितरणला खडबडून जाग आली असून शहरातील साडेतीन हजाराहून अधिक उघड्या व तुटलेल्या वीज पेट्या बंदिस्त करण्यात आल्या आहेत.
वसई विरारमध्ये नागरिकांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जात आहे. या वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने विविध ठिकाणी ५ हजार ८४६ रोहित्र व १४ हजार ६८४ वीज पेट्या संच( डीपी बॉक्स) बसविले आहेत. हे संच मुख्य रस्ते व रहदारी असलेली ठिकाणे अशा भागात ही आहेत. काही ठिकाणी पेट्यांची दरवाजे तुटून गेल्याने ते उघडे होते. या उघड्या असलेल्या वीज पेट्यामुळे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी वसई पारनाका येथील भास्करआळी परिसरात सायकल वीज पेटीला धडकून नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
आणखी वाचा- पतंगाचा स्टॉल लावण्यावरून वाद, भाजपच्या दोन माजी नगरसेविका आपसात भिडल्या
सातत्याने अशा घटना घडत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणांची तक्रार मानवी हक्क आयोगाकडे केली होती. उघड्या वीज पेट्या जीवितास धोका निर्माण करीत असल्याने त्या तातडीने बंदिस्त करण्यात याव्यात अशा सूचना महावितरणला केल्या होत्या. त्यानंतर महावितरणने शहरात बसविण्यात आलेल्या वीज पेट्यांचे सर्वेक्षण सुरू केले होते. त्यावेळी ३ हजार ६४६ इतक्या वीज पेट्या उघड्या, नादुरुस्त, जुन्या, झाकणे चोरीला गेलेल्या अशा स्वरूपाच्या आढळून आल्या. त्यातील आता ३५०० इतक्या वीज पेट्या बंदिस्त करण्यात आल्या असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. उर्वरित जे आहेत त्या ही बंदिस्त करण्याचे काम सुरू आहे असे महावितरणने सांगितले आहे.
उघड्या वीज पेट्या होत्या त्या बंदिस्त करण्याचे काम आम्ही जवळपास पूर्ण केले आहे. आता ज्या उघड्या वीज पेट्या दिसून येतात त्या सुद्धा संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देऊन बंद करीत आहोत. -संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण वसई.
आणखी वाचा-महामार्गावर ट्रॅक बंद पडल्याने दोन्ही वाहिन्यावर कोंडी; प्रवाशांचे हाल
वीज पेट्यांची झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार
शहरात वीज पेट्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र काही भुरटे चोर ती झाकणे काढून चोरून नेत असल्याचा दावा महावितरणने केला आहे. काही वेळा अशा प्रकारामुळे वीज पेट्या उघड्या राहत आहे. काही महिन्यांपूर्वी भोयदापाडा येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका इसमाने महावितरणच्या वीज पेटी काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
विजेच्या धक्क्याने मृत्यूच्या घटना
- २५ मे २०२४ रोजी वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथे स्काय हाईटस इमारतीच्या उद्यानात खेळताना उद्यानातील विद्युत खांबाचा स्पर्श होऊन जोसेफ प्रभू (९) या मुलाचा मृत्यू
- १० जून २०२४ रोजी नालासोपाराच्या महेश पार्क येथे महावितरणाच्या पथदिव्याचा धक्का लागून रोहन कासकर या तरुणाचा मृत्यू झाला होता
- २७ जून २०२४ रोजी वसई पारनाका येथील भास्कर आळी परिसरात नऊ वर्षीय झियाउद्दीन शेख या वीज पेटी संचाच्या धक्क्याने मृत्यू झाला.
- १२ जुलै २०२४ रोजी वसई पूर्वेच्या भोयदापाडा परिसरात दारूच्या नशेत वीज पेटीजवळ गेल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू