वसई: २०२३ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकी दरम्यान विजेचा धक्का लागून दोन जणांना मृत्यू झाला होता. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महावितरण विभाग सतर्क झाला असून नागरिकांना मिरवणूक काढताना विद्युत वाहक तारांचा संपर्क होणार याची विशेष दक्षता घेण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वसई विरारच्या विविध ठिकाणच्या भागातही जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम, रथ यात्रा काढल्या जातात.अनेकदा मोठं मोठे रथ तयार केले जातात याशिवाय उंच झेंडे ही बांधले जातात. झेंड्यासाठी काहीवेळा स्टीलच्या रॉडचा ही वापर केला जातो.

२०२३ मध्ये विरारच्या कारगिल नगर मध्ये मिरवणूक संपल्यानंतर परत जात असताना, बेंजोच्या हात गाड्यावर लावलेला लोखंडी झेंड्याचा रस्त्याच्या बाजूच्या विजेच्या रोहित्राला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागला होता. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता तर अन्य सात जण यात जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले होते.अशी दुर्दैवी घटना पुन्हा शहरात घडू नये यासाठी महावितरण विभाग सतर्क होऊन विशेष काळजी घेण्याचे आवाहन अनुयायांना केले आहे.मिरवणूक काढत असताना विद्युत वाहक तारा व अन्य वीज प्रवाह सुरू असलेल्या वस्तूंची संपर्क येणार नाही याकडे लक्ष द्यावे.  ज्या भागात मिरवणुका निघणार आहेत अशा मार्गावर महावितरणचे कर्मचारी सुद्धा ठेवले जाणार आहेत असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे. याशिवाय जे आयोजक आहेत त्यांनी ही त्यांच्या भागातील वीज वितरण विभागीय कार्यालयाला माहिती द्यावी जेणेकरून कोणतीही घटना घडल्यास तातडीने मदत मिळवता येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

महावितरणच्या सूचना काय

-मिरवणूक काढतांना आपल्या सोबत असलेले रथ, झेंडे, पताका यांचा महावितरण वाहिनी सोबत कोणताही संपर्क येणार नाही यावी काळजी घ्यावी.

-शक्यतो रथाची उंची ४.५ मीटर पेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

 – झेंडे, पताका साठी शक्यतो लाकडी बांबू चा वापर करावा, लोखंडी पाईप वापरु नये,

-मिरवणुकीच्या मार्गावर काही ठिकाणी विद्युत वाहिनी जात असल्यास पूर्व उपाययोजनेसाठी महावितरण कार्यालयास संपर्क साधावा.

-उत्साहाच्या भरात रथाच्या वर चढू नये तथा तसे करण्यास मज्जाव करावा.

– कार्यक्रमासाठी अधिकृत तात्पुरत्या स्वरुपात विद्युत पुरवठा घ्यावा.

२०२३ ला नेमके काय घडले होते ?

विरारच्या कारगिल नगर येथील बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक ट्रॉलीवर काही

अनुयायी उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील उभ्या असलेल्या अनुयायांना विजेचा धक्का लागला

यात रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता तर ७ जण जखमी झाले होते.