लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : वसई विरार शहरातील वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा व त्यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी वीज ग्राहक सुविधा केंद्र तयार केली आहेत. मात्र मागील पाच दिवसांपासून ही केंद्र बंद झाली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. तर दुसरीकडे यात काम करणारे कर्मचारी चिंतेत सापडले आहेत.
वसई विरार शहरात महावितरण कडून वीज पुरवठा केला जातो. वीज ग्राहकांना चांगली वीज सेवा मिळावी त्यांच्या तक्रारी व विजेच्या संबंधित विविध कामासाठी महावितरणच्या अंर्तगत वसई मंडळ कार्यालयाच्या जवळील इमारतीत वीज ग्राहक सेवा सुरू केंद्र तयार करण्यात आले होते.
वीज ग्राहकांना तत्पर व एकाच ठिकाणी वीज सेवा मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या शहरी भागामध्ये वीज ग्राहक सुविधा केंद्र हे केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनांनुसार महावितरणकडून उभारण्यात आले होते. या ग्राहक वीज सुविधा केंद्र उभारणीमागे या केंद्रामार्फत वीज ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील या उद्देशाने सुरू केले होते. या ग्राहक सुविधा केंद्रामार्फत नवीन वीज पुरवठा देणे, वीज देयकावरील नाव बदलणे व अन्य दुरुस्ती, वाढीव वीज भार, वीज देयक तक्रार निवारण, वीज देयक काढून देणे अशा विविध सेवा पुरविल्या जात होत्या.
मात्र १ डिसेंबर पासून हे वीज ग्राहक सुविधा केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. तशी नोटीस ही नोटीस या केंद्राच्या दरवाजावर लावली आहे. केंद्र बंद झाल्याने अनेक वीज ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. एकाच कामासाठी त्यांची फरफट होत असल्याचे वीज ग्राहकांनी सांगितले आहे. यासाठी लवकरच हे ग्राहक केंद्र सुरू करून पूर्ववत करावे अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. वीज ग्राहक केंद्र चालविण्यासाठी खासगी ठेकेदाराला याचा ठेका दिला होता त्याची मुदत संपुष्टात आल्याने हे केंद्र बंद झाले असल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.
आणखी वाचा- शहरबात : पर्यटन विकासाच्या घोषणाच
कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ
वसई व विरार ग्राहक सुविधा केंद्र अचानक बंद केल्यामुळे या ग्राहक सुविधा केंद्रामध्ये मागील १०-१२ वर्षापासून काम करणारे २०-२५ कंत्राटी कर्मचारी आहेत. यात बहुतेक करून महिला कर्मचारी यांचा समावेश आहे. केंद्र बंद झाल्याने त्यांच्यावर सध्या बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
गेली अनेक वर्ष त्याठिकाणी काम करत असून याच नोकरीवर उदरनिर्वाह चालतो असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. मागील तीन – चार दिवसांपासून वसई ग्राहक सुविधा केंद्राबाहेर बसून राहावे लागत आहे. आम्हाला कार्यालयात प्रवेश करून दिला जात नाही असेही त्यांनी सांगितले आहे.लवकरात लवकर हे केंद्र सुरू करून पुन्हा आम्हाला नियमितपणे कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
वीज ग्राहक सेवा केंद्रासाठी नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी तीन ते चार एजन्सी पुढे आल्या आहेत. त्यांची पडताळणी करून योग्य त्या एजन्सीची नियुक्ती केली जाईल. लवकरच याबाबत निर्णय घेऊन केंद्र सुरू होईल. -संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण वसई.