अभियांत्रिकीच्या ऑनलाइन परीक्षेत व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामवरून उत्तरे

वसई : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याची बाब समोर आली आहे. ऑनलाइन परीक्षा सुरू होताच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामच्या ग्रुपमधून उत्तरे पुरवली जात आहेत. यामुळे अभ्यास न करताच विद्यार्थी उत्तीर्ण होत असून असे गैरप्रकार रोखण्यासाठी ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

करोनामुळे मागील वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी खासगी क्लासेस चालक समाजमाध्यमांचा वापर करून या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा सुरू असताना वेगवेगळे समूह बनवून व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवर उत्तरे पाठवत आहेत. मोबाइल कॅमेरा चालू ठेवण्याच्या सूचना केल्या गेल्या, तरी त्यातील मर्यादांमुळे गैरप्रकार होत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडून परीक्षेदरम्यान २ ते ३ उपकरणांचा (डिव्हाईस) चा वापर करण्यात येतो. या परीक्षांसाठी बहुतांश विद्यार्थ्यांकडून व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम इत्यादी ऑनलाइन माध्यमांचा वापर करून विविध ग्रुप तयार करून परीक्षा चालू असतानाच उत्तरांची देवाण-घेवाण करण्यात येत असते. काही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या वेळेअगोदरच फुटल्या होत्या. अनेक शिकवणी वर्गानी (कोचिंग क्लासेस) व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान उत्तरे पुरवली आहेत, अशी तक्रार शिक्षकांनी केली आहे.

जेईई आणि नीट यांसारख्या अनेक परीक्षा केंद्रांवर घेतल्या जात असताना मुंबई विद्यापीठालाच ऑफलाइन परीक्षेबाबत अनास्था का असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने विद्यार्थी पुढील परीक्षांबाबत बेफिकिरी बाळगून आहेत. या सर्व प्रकारांमुळे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा कमालीचा खालावला गेला आहे. अभ्यास न करताच विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्यामुळे स्पर्धात्मक युगात टिकून राहणे त्यांना निश्चितच कठीण जाणार आहे. ऑनलाइन परीक्षांमुळे अभियांत्रिकी विभागाची टक्केवारी वाढली असली तरी मेहनती व गुणवंत विद्यार्थ्यांचे यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. असे गैरप्रकार करून पास झालेले विद्यार्थी प्रत्यक्ष कॉर्पोरेट क्षेत्रातील भरती प्रक्रियेत आपल्या अपुऱ्या ज्ञानामुळे थेट बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे. सिव्हिल, मेकॅनिकल यांसारख्या विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान देखील मिळेनासे झाले आहे.

उच्च शिक्षणाचा दर्जा कायम ठेण्यासाठी यापुढे सर्व परीक्षा केवळ ऑफलाइनद्वारे घ्याव्यात अशी मागणी विरारमधील शिक्षक सुबोध शिंगरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी लसीच्या दोन मात्र घेतल्या आहेत. अशावेळी सत्राच्या सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेता येईल, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

अशा पद्धतीने गैरप्रकार

परीक्षा सुरू होतात विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवर क्लस्टर ग्रुप तयार केला जातो. विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेच्या वेळी त्याचा चेहरा दाखवतो मात्र प्रत्यक्ष इतर डिव्हाईस समोर असतात. खासगी कोचिंग क्लासेसतर्फे या ग्रुपमध्ये उत्तरे पाठवली जातात. त्यामुळे विद्यार्थी सहज ही उत्तरे लिहितात. खासगी कोचिंग क्लासेसना या प्रश्नपत्रिका सहज मिळतात आणि मग त्याची उत्तरे लगेच शेअर केली जातात. पूर्ण उत्तरे मिळत असल्याने विद्यार्थी ती लिहून चांगले गुण मिळवतात. २७ डिसेंबर रोजी पुढची परीक्षा देखील ऑनलाइन असल्याने तो ऑफलाइन घेण्याची मागणी करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फिचरमुळे या ग्रुपमधील मेसेसेजनंतर डिलीट होत असल्याने पुरावेदेखील राहत नाहीत. एका जागरूक पालकाने या कॉपी प्रकरणातील काही स्क्रीनशॉटदेखील काढून याबाबत तक्रार केली आहे.