वसई : वसई पूर्वेतील भागात मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या मालजीपाडा येथे उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत ८० टक्के पुलाचे काम पूर्ण झाले असून लवकरच उर्वरित पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे रस्ता ओलांडून धोकादायक प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वसई पूर्वेतील भागात मुंबईसह इतर भागांना जोडणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ हा महत्त्वाचा महामार्ग गेला आहे. या मार्गावर असलेल्या मालजीपाडा व आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना व शाळकरी मुलांना महामार्ग ओलांडून धोकादायक प्रवास करावा लागत होता. तर काही वेळा महामार्ग ओलांडून जात असताना अपघातही घडले आहेत. यासाठी या भागात उड्डाणपूल तयार करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने येथील नागरिकांनी केली होती.
त्यानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात सुरू केले होते. परंतु मध्यंतरी करोनाचे संकट, मजुरांची कमतरता यामुळे हे काम बंद होते. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा पुलाच्या कामाला गती दिली. सध्या या पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. ब्लॉक रचून व्यवस्थितरीत्या पिचिंग करण्यात आले आहेत. आरसीसी बांधकाम करून गावातील नागरिक व वाहनांना ये-जा करण्यासाठी दोन भुयारी मार्ग ही ठेवण्यात आले आहेत. आता फक्त खडीकरण व डांबरीकरण व यासह इतर काही छोटी- मोठी कामे शिल्लक आहेत. यासाठी पुलावरील रस्ता सपाटीकरण करण्याचे कामही सुरू आहे. जवळपास आतापर्यंत ८० टक्के पुलाचे काम पूर्ण झाले आहे. राहिलेले उर्वरित कामही लवकर पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती आयआरबीने दिली आहे.
वाहतूक कोंडीतून सुटका होणार
मागील वर्षभरापासून मालजीपाडा येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या भागात खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होती. या वाहतूक कोंडीमुळे गावातील नागरिकांना रस्ता ओलांडून प्रवास करणे व इतर दळणवळण करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. आता या पुलाचे अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच वाहनचालकांची या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
मालजीपाडा येथील उड्डाणपुलाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. जे काही काम शिल्लक आहे ते येत्या १५ ते २० दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येईल.
– अमित साठे, सहायक कार्यकारी अभियंता, आयआरबी