मयुर ठाकूर

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात तब्बल १४६  बालके ही कुपोषित असल्याचे समोर आले आहे. यात दोन बालक तीव्र कुपोषित असून १४४  बालके मध्यम कुपोषित आहेत. हे कुपोषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेशी समन्वय साधून विविध उपाययोजना केल्या जातील, असे पालिकेने सांगितले,

मीरा- भाईंदरमध्ये शहरी व ग्रामीण अशा एकूण ८३ अंगणवाडय़ा आहेत, तर महापालिकेच्या बालवाडय़ांची संख्या २६ आहे. या अंगण व बालवाडय़ांमध्ये जवळजवळ १० हजारांहून अधिक मुले आहेत. एप्रिल २०१९ पासून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडयमंतर्फे केले जाते.यात ० ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी करून कुपोषणाची वर्गवारी केली जाते. यात मध्यम कुपोषित, मॅम आणि तीव्र कुपोषित अशी वर्गवारी केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका क्षेत्रात दोन बालके तीव्र कुपोषित असून १४४ बालके मध्यम कुपोषित आहेत. त्यांची दैनदिन तपासणी आणि उपचार सुरू असल्याची माहिती शिक्षण अधिकारी कविता बोरकर यांनी दिली आहे.   जिल्हा परिषदेशी समन्वय साधून लवकरच कुपोषणाला आळा घातला जाईल, असा विश्वास पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी व्यक्त केला आहे.  २०१६ रोजी तत्कालीन महापौर गीता जैन व आयुक्त अनंत गीते यांच्या पुढाकाऱ्याने   बाल संगोपन केंद्र सुरु केले होते   ते सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी केली आहे.