वसई- २३ वर्षांपूर्वी आपल्या वहिनीची हत्या करून फरार झालेल्या इसमाला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांना चकमा देण्यासाठी तो ओळख लपवून डोंबिवली येथे रहात होता. विरार मध्ये राहणार्या फिरोज अन्सारी १९९७ मध्ये शबाना परवीन हिच्यासोबत लग्न झाले होते. मात्र हे लग्न फिरोजच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. त्यांनी या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे शबाना परवीन ही गोवंडी येथे वेगळी रहात होती.
दरम्यानच्या काळात फिरोज अन्सारी याने अफरीन बानू हिच्याशी दुसरे लग्न केले आणि विरार येथे राहू लागला. त्याला शबाना परवीन पासून ५ वर्षांचा मुलगा देखील होता. त्याने दोन्ही पत्नीसोबत संसार सुरू ठेवला होता.
लग्नाच्या ५ वर्षानंतर म्हणजे ३ जून २००२ रोजी शबाना परवीन ही विरार येथे फिरोज अन्सारीच्या घरी ५ वर्षाच्या मुलाला घेऊन आली. त्यामुळे फिरोजच्या कुटुंबियांनी तिला विरोध केला. यावेळी झालेल्या भांडणात फिरोजचा मोठा भाऊ तरबेज आणि दुसरी पत्नी आफरीन या दोघांनी मिळून शबाना परवीनची धारदार शस्त्राने हत्या केली आणि त्यांच्या ५ वर्षाच्या मुलाला पळवून नेले होते. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात ६ जून २००२ मध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी तरदेब आणि आफरीन हे दोघे फरार होते.
२३ वर्षानंतर लागला छडा…
संवेदनशील आणि प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे (गुन्हे) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार या प्रकरणाचा तपास नव्याने मध्यवर्ती गुन्हे शाखेने हाती घेतला होता. त्यांनी आरोपी तरबेज याचे बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील चमन गाव गाठले. मात्र तेथून तरबेज डोंबिवली येथे रहात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी डोंबवलीत त्याचा शोध सुरू केला. तेव्हा तो पोलिसांना चकमा देण्यासाठी ओळख बदलून रहात असल्याचे समजले.
मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास करून तरबेज याला डोंबिवली येथून अटक केली. तब्बल २३ वर्षाने त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात दुसरी आरोपी असलेली आफऱीन हिला देखील लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी दिली. या आऱोपीला अटक करण्यात माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे आदींच्या पथकाने मोलाची भूमिका बजाबली