वसई – महापालिकेच्या अधिकार्‍यांना धमकीचे ईमेल तसेच अश्लील मजकूराद्वारे समाजमाध्यमांवर बदनामी कऱणार्‍या चंदन ठाकूर या आरोपीला अखेर गुन्हे शाखा-३ च्या पथकाने अटक केली आहे. मिरा भाईंदर तसेच वसई विरार महापालिकेच्या १५ हून अधिक अधिकार्‍यांना त्याने त्रास दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची अज्ञात व्यक्तीकडून समाजमाध्मयावरून अश्लील मजकूर प्रसारीत करून बदनामी कऱण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असाच प्रकार उपायुक्त दिपक सावंत यांच्याबाबतीतही घडल्याने त्यांनी देखील तक्रार केली होती. अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांची बदनामी करणे, धमकावून ब्लॅकेमल करणे असे प्रकार होऊ लागल्याने खळबळ उडली होती. असाच प्रकार मिरा भाईंदरच्या महापालिका अधिकार्‍यांच्या बाबतीतही घडला होता. त्यामुळे गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या प्रकऱणाचा तपास सुरू केला होता.सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने गुन्हे शाखा ३ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांच्या पथकाने त्याचा तांत्रिक तपास केला आणि विरारच्या ग्लोबल सिटी येथून चंदन ठाकूर या आरोपीला अटक केली.

१५ अधिकाऱ्यांविरोधात समाजमाध्यमांवरून बदनामी

याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांनी सांगितले की आरोपी चंदन ठाकूर हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर खंडणीसह ७ गंभीर गुन्हे दाखळ आहे. अधिकार्‍यांची बदनामी केल्याप्रकऱणी त्याच्या विरोधात बोळींज, बाींदर, मिरा रोड, तुळींज आणि नवघर पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल आहेत. मिरा भाईंदरचे तत्कालीन उपायुक्त रवी पवार, उपायुक्त मारूती गायकवाड यांची देखील बदनामी केली होती. आयुक्त संजय काटकर यांना देखील अश्लील मजकूर असलेला ईमेल पाठवला होता.  या प्रकऱणात त्याचा अन्य साथीदार असण्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

झोमॅटोवरून ऑर्डर मागवली आणि पकडला गेला

आरोपी समाजमाध्यमावरून बदमानी करत असला तरी पकडले जाऊ नये यासाठी तो खबरदारी घेत होता. सायबर आणि गुन्हे शाखा ३ च्या पथकाने तांत्रिक तपास करून त्याच्या सिमकार्डचा नंबर मिळवला. यावरून त्याने झोमॅटो ॲपवरून जेवणाची ऑर्डर मागविल्याचे आढळून आले. पोलिसांनी मग झोमॅटो कंपनीशी संपर्क साधून त्याचा पत्ता मिळवला आणि त्याचा पत्ता मिळवला. मात्र त्याला अटक करण्यााठी पोलीस गेले असता त्याने ४ तास दार उघडले नाही आणि पोलिसांना जोरदार प्रतिकार केला होता असे गुन्हे शाखा ३ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी सांगितले.

उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित गुंजकर, गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आदींच्या पथकाने कारवाई करून त्याला अटक केली.