लोकसत्ता विेशेष प्रतिनिधी

वसई : रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची काच तोडून आतील मौल्यवान ऐवज लंपास करणार्‍या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक केली आहे. विनोद उर्फ लंगडा पवार असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

६ फेब्रुवारी रोजी मिरा रोड येथे राहणारने हरज्योत सिंग आपली गाडी घेऊन काही कामानिमित्ताने मिरा रोडच्या हाटकेश परिसरात गेले होते. गाडी रस्त्यावर उभी करून ते दुकानात गेले होते. काही वेळाने ते परतल्यावर त्यांच्या गाडीत ठेवण्यात आलेली बॅग अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचे आढळले. या बॅंगेत लॅपटॉप, कॅमेरा असा मौल्यवान ऐवज होता. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा तोडून चोरी करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा-१ च्या पथकाकडे सोपविण्यात आला होता.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत मुंबईच्या कफ परेड येथून विनोद उर्फ लंगडा पवार (४८) याला अटक केली. आरोपी हा दिव्यांग असून सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर यापूर्वी २० पेक्षा अधीक चोरीचे गुन्हे आहेत. आपल्या एका साथीदाराच्या मदतीने तो दुचाकीवरून चोरी करण्यासाठी येत होता. धातूच्या पट्टीच्या सहाय्याने उभ्या असलेल्या गाडीची काच अवघ्या एका मिनिटात खाली करून तो आतील सामान लंपास करत होता. त्याने अशाप्रकारे वाहनांच्या काचा तोडून चोरी केल्याचे विविध गुन्हे काशिगाव, दादर, पिपंरी चिंचवड, नवी मुंबई येथील पोलीस ठाण्यात दाखल आहे.

आरोपी अत्यंत सराईत असून पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नव्हता. तो सतत बेशुध्द होण्याचा आव आणून पोलिसांना तपासातून गाफील ठेवत होता. नागरिकांनी वाहन उभी करताना त्यात आपल्या लॅपटॉवर किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवू नये, असे आवाहन गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार सचिन हुले, अश्विन पाटील, पोलीस शिपाई गौरव बारी, सौरभ इंगळे, धीरज मेंगाणे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सचिन चौधरी, संतोष चव्हाण आदींच्या पथकाने की कारवाई केली.