वसई– मंगळवारी रात्री मुंबई अहमदाबाद महामार्गावर आढळेल्या इसमाचा मृतदेह हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकऱणी पेल्हार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तुंगारेश्वर येथील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्री प्रभुकमार झा (४२) या इसमाचा मृतदेह आढळला होता. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृ्त्यू झाल्याची फिर्यांद देण्यात आली होती. त्यानुसार पेल्हार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >>> हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
झा हा एका क्रेन सर्व्हिसच्या दुकानात कामाला होता. तो नालासोपारा येथील धानिव बाग परिसरात रहाणारा होता. तो रात्री महामार्गावर का गेला? असा पोलिसांना संशय आला. पेल्हार पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी एक इसम त्याच्यासोबत दिसला. पोलिसांनी मग संतान सिंग (५०) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्येची कबुली दिली. आरोपी संतान सिंग याचे महामार्गावरर सिंग क्रेन सर्व्हिस नावाचे क्रेन पुरवणारे दुकान आहे. मयत प्रभातकुमार झा तेथे मागील १० वर्षांपासून काम करत होता. मात्र कामातील चुकीमुळे सिंग याला नुकसान झाले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. परिणामी सिंग याने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृत्यू अपघाती वाटावा यासाठी महामार्गावर आणून टाकला. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी आरोपी सिंग याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.