वसई: नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथे गोदामात खैरांची लाकूड लपवून त्यांची तस्करी करीत असल्याचा प्रकार मांडवी वनविभागाने उघड केला आहे. या कारवाई ७६८ नग इतकी खैरांची लाकडे व तस्करी साठी वापरण्यात येत असलेली वाहने वनविभागाने जप्त केली आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील ३०५ क्रमांकाच्या गोदामात खैरांची लाकडांची साठवून करून त्याची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती वनक्षेत्रपाल संदीप चौरे यांना मिळाली होती. या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास गोदामात धाड टाकली. यावेळी खैरांची लाकूड हे टेम्पोत भरण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले आहे. यात खैर वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. धनंजय महाडिक असे या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखक केला आहे.

हेही वाचा : नालासोपार्‍यात ७ वर्षांच्या चिमुकलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार

यात ७६८ नग खैरांचे लाकूड व २ वाहतूक करणारे टेम्पो असा लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई डहाणू उपवनसंरक्षक दिवाकर भावसे, सहाय्यक व संरक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेञपाल मांडवी संदीप चौरे व वनकर्मचारी यांनी केली आहे.

हेही वाचा : वसई: विशेष वाहन क्रमांक घेण्याकडे कल वाढला, पावणे दोन वर्षांत ११ हजार वाहनांची आकर्षक क्रमांकासाठी नोंदणी, ९ कोटींचा महसूल

खैर तस्करी टोळीचा तपास

वसई तालुक्यात असलेल्या जंगलात खैरजातीचे लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हे लाकूड गुटखा व कात बनवण्यासाठी वापरले जात असल्याने या लाकडाला बाजारात मोठी किंमत आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात खैर तस्करीच्या घटना घडत आहेत.मात्र अनेकदा आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जातात. मात्र या गोदामात केलेल्या कारवाईत आरोपी हाती लागल्याने खैर तस्करी करणाऱ्या टोळीचा तपास केला जाणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.