वसई: नायगाव पूर्वेच्या मुख्य रस्त्या लगत असलेल्या खाडीकिनाऱ्या लागून असलेल्या पाणथळ जागेत अज्ञात व्यक्तीकडून माती भराव केला जात असल्याचा प्रकार समोर आला. यामुळे पाणथळ जागेवर असलेली खारफुटीची झाडेही या उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नायगाव पूर्वेच्या भागातून नायगाव स्थानक ते महामार्ग असा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यालगतच स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर शासकीय पड जागा आहेत. मागील काही वर्षांपासून या शासकीय जागांवर माती भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा या खाडी किनाऱ्या लगत असलेल्या पाणथळ व कांदळवन क्षेत्राच्या जागेत राडारोडा, माती आणून टाकून भराव केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हळूहळू हा प्रकार वाढत असल्याने खाडी किनाऱ्या लगत असलेली खारफुटीची झाडे नष्ट होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
याकडे महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने असे प्रकार वाढीस लागत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. बेकायदेशीर पणे पाणथळ जागेत माती भराव टाकून खारफुटी क्षेत्र नष्ट करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पार्किंगसाठी भराव ?
विशेषतः आता पार्किंग व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभमिळत असल्यामुळे शासकीय जागेत माती भराव करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नायगाव पूर्वेतील सरकारी जागा आणि निसर्गसंपत्तीचा लिलाव सुरू केला आहे. खारफुटीची बेसुमार तोड करून त्या जागेवर मोठ्या प्रमाणात माती भराव केला जात असून त्यावर बिनधास्त पार्किंग व्यवसाय थाटण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पर्यावरणाचे प्रभाविपणे संवर्धन करणाऱ्या कांदळवनात होणारा गैरकारभार त्वरित रोखला गेला पाहिजे. वसई विरार मध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ते प्रकार थांबवेत यासाठी प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी. – समीर वर्तक, काँग्रेस पर्यावरण सेल प्रदेश अध्यक्ष
नायगाव भागात कांदळवन भागात माती भराव झाला आहे त्याबाबत तक्रारी आल्या आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी अशा सूचना केल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. – शेखर घाडगे, उपविभागीय अधिकारी वसई