मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य ढवळून निघाले आहे. या आंदोलनानमित्ता मनोज जरांगे-पाटील यांचे नाव गाजत आहे. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की आता दिवाळीच्या आकाशकंदिलावरही जरांगे-पाटील नावाने कंदील आले आहेत. पालिकेच्या दिवाळी वस्तू प्रदर्शनात ‘मनोज जरांगे-पाटील’ तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ असे घोषवाक्य असलेले कंदील लक्षवेधी ठरले आहे.
हेही वाचा >>> वसई विरार महापालिकेतील कर घोटाळा, सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना क्लिन चिट, निलंबन रद्द
केंद्रीय गृहमंत्रालय तसेच शहरी कार्यमत्रालाच्या वतीने वसई विरार महापालिकेत सध्या ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ या मोहीमेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. याच्या अंतर्गत पालिकेच्या घनकचरा विभागाने महिला बचत गटामार्फत विविध पर्यावरण पूरक वस्तूंचे प्रदर्शन भरविले आहे. त्यामध्ये महिला बचत गटाने तयार केलेल्या विविध वस्तू आहेत. पालिकेच्या सी प्रभाग समिती कार्यालय परिसरातील या प्रदर्शनाचे उद्घघाटन पालिका आयुक्त अनिलकुमार पवार, घनकचरा विभागाच्या उपायुक्ता डॉ चारूशीला पंडीत यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनातील विविध वस्तूंमध्ये एक कंदील लक्षवेधी ठरले. हे कंदील आहे मराठा आरक्षणामुळे गाजत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या छायाचित्रांचे. याशिवाय एक मराठा लाख मराठा लिहिलेले कंदील देखील आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे या साठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच आमची मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे कंदील तयार केले आहेत असे विक्रेत्या महिलांनी सांगितले.