कचऱ्यावरील प्रक्रिया ठप्प, तर प्रशासनाचे दुर्लक्ष
मयूर ठाकूर
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उत्तन येथील घन कचरा प्रकल्पभावती तब्बल १४ लाख टन कचरा प्रक्रियेविना पडून असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भु-प्रदूषण आणि जल प्रदूषण होत असून प्रशासनाचे घनकचरा प्रकल्प बंद असल्याने पर्यावरण प्रेमी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून २००८ रोजी उत्तन येथे घनकचरा प्रकल्प राबवण्यात आला. मात्र तेथील नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्यामुळे तो अवघ्या दोन वर्षांत बंद करण्यात आला व त्यांनतर २०१६ पुन्हा या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. हे कंत्राट सौराष्ट या संस्थेला देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील प्रतिदिन साधारण ४०० टन कचरा या घनकचरा प्रकल्पावर येत आहे. त्यानुसार याचे सुखा कचरा आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून यावर प्रक्रिया होऊन आणि त्यातून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येते. याकरिता पालिका प्रशासन कंत्राट दाराला प्रति टन २२० रुपये अदा करते. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून या प्रकल्पतील कचऱ्यावर प्रक्रिया न होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सध्या ४०० टन कचरा प्रकल्पात येत असला तरी कंत्राट दार केवळ दोनशे ते अडीचशे कचऱ्यावर प्रक्रिया करत असल्याचे समोर आले आहे. तर उरलेला शिल्लक कचरा त्या ठिकाणी साचला जात आहे. त्यामुळे या कचऱ्यातून निघणारे लिचड या भागात मोठ्या प्रमाणात पसरत आहे.यामुळे भू- प्रदूषण आणि जलप्रदूषण सारख्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या कचऱ्याची नुकतीच विल्हेवाट लावण्याकरिता प्रशासनाने १९ लाख रुपये खर्च करून बायो कल्चर पावडर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्य स्थितीत या ठिकाणी तब्बल १४ लाख टनहून अधिकचा कचरा प्रक्रिया विना पडून असल्याचे प्रशासनाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरिता संबंधित पालिका अधिकाऱ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांनी स्वीकारला नाही.
पर्यावरण अहवालात उल्लेख नाही
एकीकडे उत्तन येथील परिसरात १४ लाख टन या पडून असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता पालिका प्रशासने नुकतेच १९ लाख रुपये बायो कल्चर पावडर खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र दुसरी कडे २०२०- २१ करीता तयार करण्यात आलेल्या शहराच्या पर्यावरण अहवालात बंधनकारक असताना देखील त्या कचऱ्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला नाही.त्यामुळे मानवी आरोग्याला घातक असलेल्या कचऱ्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात घनकचरा प्रकल्पाच्या नावावर घोटाळा करत असल्याचे आरोप घनकचरा व्यस्थापक अभ्यासक तुषार गायकवाड यांनी केले आहेत.