वसई: काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम टूर व्यावसायिकांना बसला आहे. वसईतील अनेकांनी आपल्या नियोजित सहली रद्द केल्या आहेत. तर अनेकांनी सहलीबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारने काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत दुप्पटीने वाढ केली आहे. सध्या लाल चौकासह अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर पोलिसांबरोबरच सैन्य दलाचे अधिकारी तैनात आहेत. प्रत्येक हॉटेलबाहेर सैनिक तैनात आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र काश्मीर सहलीसाठी नोंदणी केलेल्या पर्यटकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. अनेकांनी आपल्या सहली रद्द केल्या आहेत. मी काश्मीर सहलीसाठी सहकुटुंब आगाऊ पैसे भरले होते. मात्र आता या हल्ल्यानंतर तेथे जाण्याचा बेत रद्द केला आहे अशी माहिती आगाशी येथील मनोज सांगळे यांनी दिली. केंद्र सरकारकडून अधिकृत सूचना मिळालेली नाही. मात्र वसई विरारमधील छोट्या पर्यटन कंपन्या आणि पर्यटन व्यावसायिकांनी मे मधील सहली रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
वसई -विरार , पालघरमधून काश्मीरसाठी टूर बुक केलेल्या अनेकांनी आम्ही काश्मीरला जायचे की नाही? अशी विचारणा आता करायला सुरुवात केली आहे असे वसईतील फ्रेन्ड टुर्स व एस्ट्रीम हाॕलीडेजचे मार्शल कोरीया यांनी सांगीतले. २१ ते २७ एक टुर सुरू असून हे महिन्यातील दोन ग्रुप टुरचे बुकींग झाले असून ११२ पर्यटकांना घेऊन ती देखील केली जाणार आहे. काश्मीरची नजीकच्या काळातील परिस्थीती व पर्यटकांचा कल यावर टुर रद्द करणार का याचा निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
भक्ती हॉलिडेज वसईच्या संचालीका भक्ती म्हात्रे यांनीही नियोजीत काश्मीर टुर या तेथील परिस्थिती पाहून पर्यटकांच्या संमतीने निर्णय घेऊन घेतली जाईल असे सांगितले. ऐन वेळी टुर रद्द केल्यास विमान प्रवासाचे पैसे मिळत नसल्यामुळे तो आर्थिक फटका पर्यटकांना बसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हाॅटेल व ट्रॅव्हल्स वाल्यांना आगाऊ बुकींग साठी दिलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीर सहली पाठोपाठ अमृतसर – वैष्णोदेवी , सिमला ,कुलू – मनाली , धर्मशाला या सहलींवरही थोडाफार परीणाम जाणवू लागला आहे. सरकारकडून जोपर्यंत टूर्स थांबवण्याचे आदेश येत नाहीत तोवर काश्मीर टूर ठरल्याप्रमाणे होतील असेही टुर कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
वसईतील पर्यटक सुखरूप
काश्मीर सहलीसाठी वसईहून गेलेला एक गट गुरूवारी रात्री वसईत सुखरूप पोहोचला. आम्ही ११ जण १७ एप्रीलला काश्मीर साठी रवाना झालो होतो.पहेलगामवरुन आम्ही श्रीनगरला यायला निघालो आणी पाठोपाठ पहेलगामला हा हल्ला झाला. २३ तारखेला हाॅटेलमध्ये श्रीनगर बंद असल्यामुळे अडकून पडलो होतो. महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला मदतीसाठी संपर्क साधला गेला होता. आगाऊ विमान प्रवासाची बुकींग असल्यामुळे २४ तारखेला श्रीनगर – दिल्ली – मुंबई प्रवास करत सुखरुप वसईला पोहचलो, असे निलम म्हात्रे यांनी सांगितले.