वसई: वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांपाठोपाठ आता बोगस प्रयोगशाळा (लॅब) कार्यरत असल्याचे समोर आले आहे. एकाच डॉक्टरांच्या डिजिटल स्वाक्षरी वापरून अनेक लॅबमध्ये रुग्णांना तपासणीचे वैद्यकीय अहवाल देण्यात येत आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मान्यता रद्द केलेल्या डॉक्टराच्या स्वाक्षरीने रुग्णांना वैद्यकीय तपासणी अहवाल दिले जात आहेत. वसई विरार महापालिकेने अशा प्रयोगशाळांना केवळ नोटीस पाठविण्यापलिकडे काहीही कारवाई केलेली नसल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार शहरात दिडशेहून अधिक प्रयोगशाळा आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (मेडिकल कॉऊन्सिल) च्या मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून या प्रयोगशाळा (लॅब) चालविणे अपेक्षित आहे. मात्र अनेक प्रयोगशाळा या पॅथोलॉजिस्टच्या अनुपस्थितीत चालविल्या जात आहेत. या प्रयोगशाळांमधून रुग्णांचे रक्त-लघवीच्या नमुन्यांचे संकलन केले जाते. पॅथोलॉजिसट, डॉक्टर नसताना रक्त लधवीच्या नमुन्यांची तंत्रत्रांकडून चाचणी केली जाते. एकाच डॉक्टरांच्या डिजिटल स्वाक्षरीने वैद्यकीय अहवाल दिले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने केला आहे.

मान्यता रद्द झालेल्या डॉक्टराची स्वाक्षरी

डॉ राजेश सोनी हे गुजराथ मधले डॉक्टर आहेत. मात्र ते वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरातील प्रयोगशाळेतील रुग्णांना वैद्यकीय चाचणीचे अहवाल देत होते. याबाबत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजिस्टने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सुनावणी होऊन २०२१ मध्ये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने त्यांचा परवाना ६ महिन्यांसाठी रद्द केला होता.

हेही वाचा… झाडाची फांदी कोसळून वसईतील शिक्षिका जखमी, उपचारासाठी २५ लाखांचा खर्च

मात्र त्यानंतरही ते प्रयोगशाळेतून रुग्णांना वैद्यकीय चाचणीचे अहवाला देत होते. त्यामुळे वैद्यकीय परिषदेने त्यांच्या परवान्याचे नूतणीकरण केलेेले नाही. तरी देखील ते वसई विरार मधील अनेक प्रयोगशाळेतून रुग्णांना चाचणी अहवाल देत आहेत. याबाबत वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. पालिकेने संंबंधित प्रयोगशाळांना नोटिसा बजावण्यापलिकेडे काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.

वसई विरार महापालिकेकडून ५ प्रयोगशाळांना नोटिसा

डॉक्टच्या अनुपस्थितीत वैद्कीय चाचणी अहवाल देऊ शकत नाही असा नियम आहे. डॉक्टर राजेश सोनी याची वैद्यकीय प्रमापत्र वैधता २०२१ मध्येच संपल्याने वसई विरार महापालिकेने ५ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र एकाही प्रयोगशाळेवर अथवा डॉक्टर सोनी याच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. आम्ही नोटिसा बजावल्या असून गुन्हे दाखल करण्याचे अधिकार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला आहेत असे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी सांगितले.

गुन्हे दाखल करण्याची मागणी

वसई विरार मनपा आरोग्य विभाग फक्त नोटीसा पाठवून बोगस लॅब चालक, बोगस पॅथोलॉजिस्ट यांना पाठीशी घालायचं काम करत आहे. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णांना वैद्यकीय चाचणीचे अहवाल देणार्‍या प्रयोगशाळांविरोधात अन्य जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वसईतही डॉ सोनी आणि संबंधित प्रयोगशाळांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी रुग्णमित्र राजेंद्र ढगे आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे कार्यकारिणी सदस्य डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी केली आहे. या डॉक्टरांनी रुग्णांना डेग्यूंचे निदान झाल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालामागे काही षडयंत्र असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many labs are being run in the absence of the pathologists medical reports are being given with the digital signature of a single doctor in vasai virar dvr
Show comments