वसई : वसई, विरारमध्ये असलेल्या अनेक तलावांची अवस्था फारच बिकट बनली आहे. त्यांचे योग्यरित्या संवर्धन व स्वच्छता होत नसल्याने तलाव आता प्रदूषित झाले असल्याचे दिसून येत आहे.शहरात असलेली अनेक जुनी व ऐतिहासिक तसेच नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले तलाव आहे. या तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिका तलावांचे पुनरुज्जीवन करून त्याचे टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येत आहेत. शहरात शंभराहून अधिक तलाव असून अनेक तलाव सुशोभीत करून विकसित केले आहेत. मात्र त्यानंतर त्या तलावांचे संवर्धन व स्वच्छतेकडे पाठ फिरवली असल्याने शहरातील अनेक तलाव प्रदूषित झाले आहेत.
वसईतील कामण, चुळणे, माणिकपूर, गोखीवरे, आचोळे यासह विविध भागात तलावांची दयनीय अवस्था झाली आहे. सद्यास्थितीत तलावात मोठ्या प्रमाणात कचरा, शेवाळ, गाळ, जलपर्णी तयार झाली आहे. पालिकेकडून तलाव स्वच्छता न केल्याने त्या तलावातील पाणीसुद्धा पूर्णत: दूषित झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. चुळणे येथे निसर्गरम्य असे तलाव आहे. मात्र या तलावाची फारच अवस्था बिकट झाली आहे. तलावात गवत व कचरा साचून त्यातील पाणी प्रदूषित झाले आहे, असे येथील सामाजिक कार्यकर्ते जॅक गोम्स यांनी सांगितले आहे. वसई पूर्वेच्या गोखीवरे येथील तलावात गटाराचे व आजूबाजूचे सांडपाणी येत असल्याने त्या तलावांची स्थिती वाईट झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान, तलाव संवर्धनाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. जे तलाव अस्वच्छ आहेत ते सुद्धा स्वच्छ केले जातील, असे उपायुक्त (वृक्ष प्राधिकरण व उद्याने) समीर भूमकर यांनी सांगितले.
१२८ तलाव अस्वच्छ
स्पार्क ( सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ एरिया रिसोर्स सेंटर) या संस्थेचे प्रसिद्ध नगररचनाकार अनिरुद्ध पॉल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत शहरातील तलावांची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. यात त्यांनी १८४ ठिकाणी असलेल्या तलावांचे सर्वेक्षण केले यात त्यांनी केलेल्या अभ्यासात १२८ तलाव हे अस्वच्छ, प्रदूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावांचा बळी ?
वसई, विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. काँक्रीटकरण आणि वाढत्या जंगलामुळे येथील भूजल पातळी खालावत असल्याने विविध ठिकाणच्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असते. जलस्राोत टिकवण्यासाठी तलाव व बावखळ यांचे संवर्धन होणे गरजेचे बनले आहे. महापालिकेने शहरात तलाव विकसित केली आहेत ती सिमेंट काँक्रीटीकरणाचा वापर करून केली असल्याने एकप्रकारे सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावांचा बळी दिला जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. तलाव विकसित करताना ते नैसर्गिक पद्धतीने कसे होईल, यावर भर द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.