वसई : गेल्या १७ वर्षांपासून रस्त्यावरील अनाथ, गतिमंद, मनोरुग्ण, आजारी आणि वृद्धांना आधार देणाऱ्या वसईस्थित ‘मराठा लाइफ फाऊंडेशन संस्थे’च्या आश्रमाला अनाथांच्या संगोपनासाठी धडपड करावी लागत आहे. आश्रमातील अडीचशेहून अधिक अनाथांचे संगोपन, त्यांचे उपचार, अनाथांच्या मुलांची गुरुकुल शाळा चालवणे यासाठी दरमहा ४ लाखांहून अधिक खर्च येतो. त्याचा मेळ कसा जमवायचा हा संस्थेसमोरील प्रश्न आहे. याशिवाय आश्रमात दररोज येणारे नवीन अनाथ, त्यांच्या राहण्याची सोय करणे यासाठी संस्थेला विस्तारित इमारत उभारायची असून नाशिक येथे आश्रम उभारायचा आहे. यासाठी संस्थेला मोठ्या आर्थिक आधाराची गरज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Pavana River: पत्नीशी भांडून पतीनं नदीत मारली उडी; बचावकार्यात अग्निशमन दलाला आले अपयश, पण ८ तासानंतर…

पालघर जिल्ह्यातील विरार शहराच्या पूर्वेला असलेल्या भाताणे गावात किसन लोखंडे या सेवानिवृत्त सैनिकाने १७ वर्षांपूर्वी अनाथांची सेवा करण्यासाठी ‘मराठा लाइफ फाऊंडेशन’ नावाने आश्रम सुरू केला आहे. रस्त्यावर सापडलेले अनाथ, मतिमंद, गतिमंद, मनोरुग्ण वृद्ध, आजारी व्यक्ती ज्यांना कोणी वाली नाही अशा अनाथांना या संस्थेत आणून त्यांची विनामूल्य सेवा केली जाते. संस्थेकडून त्यांना हक्काचा निवारा दिला जातो. त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय केली जाते. त्यांच्यावर उपचार केले जातात. ‘अनाथांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या भावनेतून विनामूल्य सेवा केली जाते. पालघर जिल्ह्यात कुठेही निराधार, गतिमंत, मतिमंद व्यक्ती आढळली की पोलीस त्यांना या संस्थेत घेऊन येतात.

ही संस्था २००७पासून कार्यरत आहे. आश्रमात येणाऱ्या अनाथांची संख्या वाढत आहे. सध्या संस्थेतील आश्रमात अडीचशेहून अधिक निराधार गतिमंद, वृद्ध, अंथरुणाला खिळलेले रुग्ण तसेच मनोरुग्ण आहेत. अंथरुणाला खिळलेल्या आजारी रुग्णांच्या उपचारांचा मोठा खर्च होत असतो. संस्थेत जे मनोरुग्ण आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन उभारून त्यांच्यावर उपचार करावे लागतात. त्यांच्या आजारपणातील उपचारांचा खर्च वाढू लागला आहे. त्यामुळे महिन्याला ४ लाखांहून अधिक खर्च येतो. दर महिन्याला दाते शोधले जातात. पण जेमतेम दीड ते दोन लाखांपर्यंत जुळवाजुळव होते. उर्वरित २ ते अडीच लाख रुपयांसाठी त्यांना कसरत करावी लागत असल्याने संस्थेला आर्थिक चणचण भासत आहे.

शाळा आणि विस्तारित इमारतीची गरज

संस्थेत अनेकदा अनाथ महिला त्यांच्या चिमुकल्या मुलांसह दाखल होतात. या मुलांसाठी आश्रमात गुरुकुल या शाळा सुरू करण्यात आली असून त्यात आश्रमासह गावातील मुले शिक्षण घेत आहेत. मुलांची संख्या वाढत असून गुरुकुल शाळेचा विस्तार, आणखी एका इमारतीची उभारणी आणि त्र्यंबकेश्वरलाही आश्रम बांधण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha life foundation ngo care orphans in vasai zws