सुहास बिर्हाडे, लोकसत्ता
वसई : येत्या ईस्टर संडे अर्थात रविवारसाठी सर्व बेकऱ्या, केक शॉप सज्ज झाले आहेत. ईस्टर ब्रेड्स, गाजराचा केक, ईस्टर थीमचे कप केक आणि चॉकलेटची अंडी, ससे, कोंबड्या अशा पदार्थांची रेलचल सर्वच दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे. यंदा ईस्टर हॅम्परची मागणी तब्बल २० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच यावेळी मागील तीन वर्षांच्या तुलनेत जास्त विक्री झाली आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान म्हणून ईस्टर सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी चाळीस दिवसांचा उपवास संपतो. या सणात एकमेकांना भेटवस्तू देतात. खास ईस्टर सणासाठी दुकाने आठवडाभर आधीच सज्ज झालेली असतात. सुंदर नक्षीकाम केलेली घरट्यातली अंडी, गवतातला ससा, सोबत गाजर, कोंबडी यासह बास्केटमध्ये सजवलेली चॉकलेट्स, ससा-कोंबडीच्या आकाराच्या कॅन्डी, कपकेक असे सगळे लावलेले असते.
आणखी वाचा-बायकोला धडा शिकविण्यासाठी अजब शक्कल, दादर आणि कल्याण स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी
या अंड्यांमध्ये कॅन्डी, गोळ्या, ड्रायफ्रुट, चॉकलेट्स अलिकडे तर त्यात स्टिकर्स, छोटी खेळणीही असतात. यासोबतच चॉकलेटपासून बनवलेले बनी अर्थात ससा (सशाचे पिल्लू), कोंबडी हे देखील दिले जाते. सर्वांच्या घरात गाजराचा केक किंवा इतर चवीचे केक, कपकेक खाल्ले जातात. ईस्टर पदार्थांना वर्षागणिक १२ ते १५ टक्क्यांनी मागणी वाढताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी ही मागणी २० टक्क्यांहून अधिक वाढली असल्याचे केकरिना केक शॉपचे व्यवस्थापक नरेंद्र यादव यांनी सांगितले.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, अलिबाग आदी ठिकाणी बेकरी, केक शॉप, कॅफे आदी ठिकाणी आतापर्यंत ७६ हजार अंडी, २६ हजार कोंबड्या, ३४ हजार ससे पाठवले आहेत. तर ८० हजार कपकेक, २१ हजार अर्धा किलोचे केक आणि १९ हजार ब्रेड पाठवले आहेत. ब्रेडमध्ये विविध हर्ब्स, ड्राय टोमॅटो-कांदा घातलेले असे विविध चवीचे ब्रेड या काळात साईड डिश म्हणून खाल्ले जातात म्हणून अशा ब्रेडची विक्री ईस्टरमध्ये होते. ईस्टरपर्यंत हा विक्रीचा आकडा २ लाखांपर्यंत जाऊ शकतो. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या ऑर्डरमध्ये जवळपास ३१ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे, असे वी बेकॉलॉजी क्लाऊड किचनच्या व्यवसाय विकास प्रमुख प्रियांका जामदानी यांनी सांगितले.
आणखी वाचा-गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ईस्टर हॅम्परची मागणी वाढली
मागील वर्षापासून गिफ्ट हॅम्पर या प्रकाराची चलती पाहायला मिळत आहे. साधे गिफ्ट वेष्टनात गुंडाळून देण्याऐवजी ते हॅम्पर स्वरुपात देण्याचा कल (ट्रेंड) सध्या दिसून येत आहे. तर, ईस्टरचे सर्व पदार्थ चॉकलेट, केक, कॅन्डी हे सुंदररित्या विविध आकाराच्या बास्केटमध्ये सजवून भेट म्हणून दिले जातात. अनेक बेकरी, केक शॉप ग्राहकांच्या मागणीनुसार गिफ्ट हॅम्पर बनवून देत आहेत. तर अनेक ठिकाणी विविध किंमतींच्या श्रेणीतील हॅम्पर बनवून ठेवलेले आढळतात. गिफ्ट हॅम्पर किंवा ईस्टर हॅम्पर हे गिफ्ट क्युरेटरकडून डिझाईन करन घेतले जातात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अशा हॅम्परची मागणी जवळपास १८ ते २० टक्क्यांनी वाढल्याचे दिसते, ही माहिती गिफ्ट क्युरेटर आणि गिफ्ट ऑन या गिफ्ट उत्पादक कंपनीच्या गिफ्ट सल्लागार अश्विनी सरदेसाई यांनी दिली.
ईस्टर म्हणजे काय? ईस्टरला अंड्याचे महत्त्व का आहे?
ईइ. स. ३२५ च्या ख्रिस्ती विश्वपरिषदेपासून ईस्टरच्या चाळीस दिवस आधी राखेच्या बुधवार नंतर उपवास काळ सुरू होतो. या काळात आत्मचिंतनावर, भक्तीवर भर दिला जातो. उपवास काळाचा शेवटचा आठवडा हा पवित्र सप्ताह मानला जातो. गुड फ्रायडेला प्रभू येशूला क्रूसावर चढवले जाते आणि त्यानंतर तीन दिवसांनी अर्थात रविवारी प्रभू येशू पुन्हा जन्म घेतात, ते पुनरुत्थित झाले. याच नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून अंड्याला या सणात खूप महत्त्व दिले जाते, ही माहिती फादर लॉरेन्स मॅस्करिनस यांनी सांगितली.