विरार : करोनाकाळानंतर निर्बंधरहित पहिलीच दिवाळी असल्याने नागरिकांत मोठा उत्साह आहे. यामुळे बाजारातसुद्धा नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता व्यापारी वर्गातसुद्धा उत्साह असल्याने बाजारातसुद्धा वेगवेगळय़ा प्रकारच्या वस्तूने सजल्या आहेत. या वर्षी चिनी वस्तूंबरोबर भारतीय बनावटीच्या वस्तूंनासुद्धा चांगली मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
करोनाकाळात शासनाचे निर्बंध असल्याने नागरिकांना सार्वजनिक स्वरूपात सण साजरे करता आले नाहीत; पण या वर्षी करोनाकाळ संपुष्टात आल्याने शासनाने सर्वच निर्बंध हटविले आहेत. यामुळे नागरिकांत दिवाळी सणाच्या बाबतीत मोठा उत्साह आहे. यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठांत नागरिक मोठी गर्दी करत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. असे असले तरी नागरिक मनसोक्त खरेदी करत आहेत.
बाजारात या वर्षी चिनी वस्तूंबरोबर भारतीय बनावटीच्या वस्तूंचा भरणा दिसत आहे. त्यांनासुद्धा चांगली मागणी आहे. त्यात वेगवेगळय़ा प्रकारच्या लायटिंग, आकाशकंदील, तोरणे, रांगोळीचे साचे, त्याचबरोबर इलेक्ट्रिक सजावटीच्या वस्तू मोठय़ा प्रमाणात बाजारात आल्या आहेत. त्यांनासुद्धा ग्राहकांची पसंती मिळत आहे. विरारमधील व्यापारी जयकांत पाटील यांनी सांगितले की, या वर्षी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. चिनी वस्तूंच्या तुलनेने भारतीय वस्तू १० ते ३० टक्के महाग आहेत; पण ग्राहक त्यांची मागणी करतात, तर काही चिनी वस्तू स्वस्त असल्याने त्यांची मागणीसुद्धा वाढत आहे. या वर्षी प्लास्टिकबंदी असल्याने कागदाचे विविध आकारांचे, रंगीबेरंगी कंदील आले आहेत. त्यात बांबूचे आणि फायबरचे कंदील बाजारात आले आहेत; पण काही ठिकाणी सर्रास प्लास्टिकच्या वस्तू वापरल्या जात आहेत.