वसईत अवघ्या तीन तासात दुसरी आग दुर्घटना घडली आहे. वसई पूर्वेच्या कामण बेलकडी येथे बांबू ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली असून आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. वसई पूर्वेच्या कामण बेलकडी परिसर आहे. या परिसरात एका गोदामात बांबू ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री अचानकपणे या बांबूना आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक
आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीचे लोळ हवेत उंच उंच उसळत आहेत. स्थानिकांनी याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करीत आहेत. नेमकी आग कशा मुळे लागली याचे कारण अजून अस्पष्ट आहे. आजच्या दिवसात अवघ्या तीन तासातील ही दुसरी आग दुर्घटना आहे. सायंकाळी सहा वाजता विरार पूर्वेच्या साईनाथ नगर येथील चप्पल दुकानाला आग लागली होती.