वसई: विरार पूर्वेच्या साईनाथ नगर भागात चप्पल दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाने अवघ्या तासाभरातच या आगीवर नियंत्रण मिळविले. विरार पूर्वेच्या भागात साईनाथ नगर परिसर आहे. या परिसरात चप्पल विक्रेत्याचे दुकान आहे. सायंकाळच्या सुमारास दुकानाच्या जवळ झाडू मारून कचरा पेटविला होता. त्याची ठिणगी दुकानावर उडाली आणि भीषण आग लागली.
हेही वाचा >>> मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
या आगीच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या आगीची माहिती येथील नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. याशिवाय पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निबंबाच्या साहाय्याने अवघ्या तासाभरातच आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे दुकान मालकांचे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले आहे. मुख्य रस्त्यावरच ही दुकाने असल्याने रस्त्यावरुन ये जा करणाऱ्यांची दुर्घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.