लोकसत्ता प्रतिनिधी
वसई: वसई पूर्वेच्या नवघर समर्थ रामदास नगर मुरार बाग येथे घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. शॉट सर्किट झाल्याने ही आग लागली होती त्यातच सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठे नुकसान झाले आहेत.तर अग्निशमन दलाचा जवान व पोलीस कर्मचारी यात किरकोळ जखमी झाला आहे
वसईत एकापाठोपाठ एक आग दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. वसई पूर्वेच्या नवघर समर्थ नगर येथील मुरार बाग येथे खोली क्रमांक तीन मध्ये इरफान खान व त्यांचे कुटुंब राहते. बुधवारी घरात अचानकपणे शॉट सर्किट होऊन आग लागली होती. या आगीची माहिती तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान घरात असलेल्या घरगुती सिलेंडरचा ही स्फोट झाला. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर अडकून पडलेल्या तीन महिला व दोन लहान मुलं यांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
या स्फोटामध्ये अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगेश भोईर, मिलिंद दळवी , वैभव राऊत, विवेक भोईर या अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणासाठी प्रयत्न केले. तर माजी नगरसेविका किरण चेंदवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेत तेथील नागरिकांना मदत केली.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुरार बाग या इमारतीमध्ये शेकडो कुटुंब राहत आहे. या आग दुर्घटनेत सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्फोटात घरातील भिंत, खिडक्या व अन्य साहित्य याची नासधूस झाली आहे.
या पूर्वीच्या घराला आग दुर्घटना
- ३० मार्च २०२५ रोजीनायगाव पश्चिमेच्या उमेळा फाटा रस्त्यालगत असलेल्या मजुरांच्या झोपडीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत मजूर कुटुंबाचा संसार जळून खाक झाला होता.
- २३ मार्च २०२५ नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा परीसरात स्टीलच्या दुकानाला भीषण आग लागली होती. याआगीमुळे दुकानात असलेल्या छोट्या पाच सिलेंडरचे स्फोट झाले होते.
- १५ मार्च २०२५ रोजी वसई पश्चिमेच्या दत्तानी मॉलच्या मागील बाजूस असलेल्या झोपड्यांना रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यात ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्याने गोरगरिबांचे संसार उध्वस्त झाले होते.
- १० मार्च २०२५ विरार मध्ये एका शिक्षिकेच्या घराला आग लागल्याची घटना घडली होती या आगीत घरी तपासणीसाठी बारावी वाणिज्य शाखेचे आणलेल्या१७० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या.